उरण : कोप्रोली येथील आयसीटीपीएल कंपनीच्या मनमानीला, प्रकल्पग्रस्तांची कामगार भरती करण्यास टाळाटाळ करू पाहणाºया अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांनी धडा शिकवला. प्रकल्पग्रस्तांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करून कामकाज बंद पडताच कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले, यानंतर आंदोलन मागे घेतले.उरण तालुक्यातील कोप्रोली ग्रा. पं.च्या हद्दीत आयसीटीपीएल कंपनी आहे. या कंपनीत सर्वेअर, सफाई कामगार व इतर कामांसाठी येथील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे. विविध कामांसाठी प्रकल्पग्रस्तांच्या सर्वेअर पदासाठी मुलाखतीही घेतल्या मात्र , मुलाखतीनंतरही अद्यापही प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला कंपनीने भीक घातली नाही. कामगार भरतीबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीच्या पदाधिकाºयांना कंपनीचे व्यवस्थापक जेकब थॉमस जाणीवपूर्वक भेट नाकारीत होते. कामगार भरतीमध्ये टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत होते. कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. प्रकल्पग्रस्तांच्या असंतोषाचा स्फोट शुक्रवारी झाला. संतप्त प्रकल्पग्रस्तांनी शेतकरी समितीचे अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या प्रवेशद्वारावरच जोरदार धडक दिली. कंपनीविरोधात घोषणाबाजी करीत कामकाजही काही तास बंद पाडले. यावेळी कंपनीने तातडीने समिती आणि पोलिसांबरोबर बैठक बोलावली. यावेळी चर्चेत येत्या काही दिवसात प्रकल्पग्रस्तांची कामगार भरती करण्यात येईल असे आश्वासन दिले.
आयसीटीपीएलचे कामकाज पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 6:11 AM