नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे कोल्हारे गावाची नळपाणी योजना गेल्या आठवड्यापासून बंद आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहून नेणारे नादुरुस्त खांब बदलले जात नाहीत. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होऊन पंप जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहेत. महावितरण कंपनीविरुद्ध प्रचंड नाराजी कोल्हारे ग्रामस्थ यांच्यामध्ये पसरली असून, पाणीपुरवठा सामितीने जाहीर फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. भारत निर्माणच्या पेयजल कार्यक्रमातून कोल्हारे येथील नळपाणी योजना तयार करण्यात आली होती. गतवर्षी या नळपाणी योजनेचे उद्घाटन झाले होते. या योजनेचे पाणी कोल्हारे गाव, बोपेले तसेच कातकरवाडी आणि रामकृष्णनगर या भागाला दिले जाते. उल्हास नदीवर उगम असलेल्या या नळपाणी योजनेचे पाणी विहिरीत आणून त्यावर विद्युत पंप लावण्यात आले आहेत. यासाठी कोल्हारे गावात असलेल्या रोहित्रामधून विजेचा पुरवठा केला आहे. वीज रोहित्रपासून उल्हास नदीवरील पंप हाऊस हे अंतर किमान दोन किलोमीटर आहे. यादरम्यान कोल्हारे कातकरवाडी असून, तेथे वीज पोहोचून ती पुढे पंप हाउस येथे जाते. त्या संपूर्ण मार्गात असलेले अनेक विजेचे खांब किमान २० वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक खांब जीर्णावस्थेत असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत; तर काही खांब झुकलेल्या अवस्थेत आहेत. कोल्हारे ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा आणि स्वछता समिती यांनी कर्जत आणि नेरळ येथील महावितरण कंपनीला याबाबत लेखी तक्र ारी केल्या आहेत. मात्र महावितरण कंपनीकडून नादुरुस्त विजेच्या खांबाची दुरु स्ती करण्यात न आल्याने पंपहाऊसमध्ये होणारा वीजपुरवठा खंडित स्वरूपात आहे.गेल्या सहा महिन्यांत तब्बल १० वेळा वीजपंप नादुरु स्त झाले आहेत. त्यावर आतापर्यंत कोल्हारे पाणीपुरवठा समितीने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र महावितरणने कोल्हारे नळपाणी योजनेला अखंडित वीजपुरवठ्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष राहुल गोमारे यांनी केला आहे. आठ दिवसांपासून नादुरुस्त वीजवाहिन्यांमुळे कमी दाबाने वीज पंपहाऊसपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कोल्हारे गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू असून, महिलांना डोक्यावर हंडे घेऊन उल्हास नदीवर जावे लागत आहे. या सर्व प्रकरणास पूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप कोल्हारे पाणीपुरवठा समितीने केला आहे. (वार्ताहर)
कोल्हारे गावाची नळपाणी योजना बंद
By admin | Published: October 10, 2015 11:36 PM