लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सायंकाळ नंतर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गडब भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून अनेक घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावर पाणी साचले असून अनेक वाहने पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पेण तालुक्यात गडाब सह अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात पंधरा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. बुधवारी पावसाळी वातावरण निर्माण झाले असल्याने सायंकाळी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यात इतर भागापेक्षा पेण मध्ये पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गडव परिसरात पाण्याचे लोट उसळले असून नागरिकाच्या घरात पाणी घुसले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.