राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जिल्ह्यात दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. थंडी ही कमी होऊन गर्मी सुरू झाली आहे. त्यात मंगळवारी जिल्ह्यातील काही भागात अवेळी पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी सकाळपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. काही भागात तुरळक पावसाच्या सरी पडल्या आहेत. थंडीत पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू आहे. कडधान्य, पांढरा कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. आंबा, काजू फळपिके मोहोर धरू लागला आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर पासून थंडी हंगाम सुरू झाल्याने रब्बी पिकांना चांगले वातावरण तयार झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील वातावरणात बदल सुरू झाला आहे. थंडीची तीव्रताही कमी झाल्याने गर्मी वाटू लागली आहे. त्यात मंगळवार पासून पावसाचे विघ्नही आले आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील दक्षिण भागात सायंकाळी पावसाच्या सरी पडल्या. तर रात्री अलिबाग तालुक्यातील काही भागात पावसाने सुरुवात केली होती. जिल्ह्यात वाल, मूग, चवळी, हरभरा ही कडधान्य शेतकऱ्यांनी लावली आहेत. अलिबाग मध्ये पांढरा कांदा ही लावला असून पीक तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अशावेळी पावसाचे आगमन झाले असल्याने या पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हा चिंतेत सापडला आहे.
जिल्ह्यातील वाल पोपटीला मुकण्याची शक्यता
जिल्ह्यात वाल पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील वाल हा प्रसिद्ध असून वालाच्या शेंगा ह्या पोपटीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्याने वाल पीक हे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे यंदा पावसामुळे पोपटीला जिल्ह्यातील वाल मिळणे अवघड झाल्यास पुण्याच्या वालावर पोपटीची चव चाखावी लागणार आहे.