मुरुड : तालुक्यात मंगळवारपासून ढगाळ वातावरण झाल्याने स्थानिक शेतकरी धास्तावले आहेत. कडधान्य घेणाऱ्या पिकावर संक्रात तर येणार नाही ना, या चिंतेत येथील शेतकरी आहेत. नुकताच अवकाळी पाऊस येऊन गेला; त्यामुळे प्रचंड प्रमाणात भातशेतीचे व बागायत जमिनीचे नुकसान झाले होते. त्यातच मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सध्या सफेद कांदा, वाल, चवळी, घेवडा, कलिंगड, नाचणी, वरी, चिबुड, पडवळ, मेथी, कोथिंबीर आदीची लागवड केली आहे. या पिकांना पाऊस नको असतो, कारण हिवाळ्यातील दवाच्या पाण्यावर ही पिके तयार होतात. जर का पाऊस पडला तर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकरी आता पाऊस नकोच, अशी विनवणी करीत आहेत; परंतु बदललेल्या हवामानामुळे निसर्गाचे चक्र बदलत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाचे थेंब बरसले; परंतु ते सौम्य स्वरूपात होते. मुरुड तालुक्यात ३९०० हेक्टर उत्पादित जमिनीपैकी २१०० हेक्टर क्षेत्रात कडधान्य पिके घेतली जातात. वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस न पडावा हीच अपेक्षा येथे व्यक्त होताना दिसत आहे.बागायत जमिनीत आता सुपारीच्या उत्पादनास बहर येत आहे, अशा वेळी या पिकाला पाऊस हा घातक मानला जात आहे. वातावरणात बदल झाल्याने याचा परिणाम मानवी आरोग्यवरही झालेला दिसून येत आहे. घसा खवखणे, सर्दीची लागण व सौम्य ताप याचा त्रास नागरिकांना होतआहे.पावसाने सुपारी बागायतदारांची तारांबळरेवदंडा : गेले तीन दिवस पावसाचे सावट असताना, गुरु वारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने शिडकाव केल्याने सुपारी बागायतदारांची तारांबळ उडाली. वाळत घातलेली सुपारी पहाटे अनेक जणांना उचलायला लागली.पावसाच्या शिडकावा सुरू असतानाच बत्ती गूल झाली. दिवसभर ढगाळ हवामान असून हवेत उष्मा वाढला आहे. सातत्याने बदलत चाललेल्या हवामानामुळे आंबा, काजू व सुपारी बागायतदार धास्तावले आहेत. अनेक बागायतदारांची वाळत टाकलेली सुपारी भिजली आहे.या आधी अवकाळी पाऊस तसेच क्यार आणि महा या चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस याचा फटका रायगडमधील शेतकºयांना बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर होऊन नुकसानीची भीती वाटत आहे.
ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले; कडधान्य पिकावर परिणाम होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 2:04 AM