ढिसाळ मोबाइल नेटवर्कचा ग्रामस्थांना फटका; बोर्लीकरांचे तिसऱ्यांदा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:27 AM2020-12-05T00:27:56+5:302020-12-05T00:28:07+5:30
भविष्यात शहर बंद ठेवून तीव्र आंदोलन करणार
दिघी : मोबाइल नेटवर्कमध्ये सुधारणा होत नसल्याने बोर्लीपंचतन येथील ग्रामस्थांकडून शुक्रवारी तिसऱ्यांदा मोर्चा काढण्यात आला. या समस्येवर निवारण करण्यासाठी नेटवर्क अधिकारी उपस्थित न राहता दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते या भागामध्ये मोबाइल कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कित्येक महिन्यांपासून अधिकाऱ्यांना सांगूनदेखील कोणतीही कार्यवाही होत नाही. यासाठी बोर्लीपंचतन येथील ग्रामस्थांकडून शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले. मागील महिन्यात दोन वेळा आंदोलने झाली असून, अद्याप एकही वेळा या समस्येवर निवारण करण्यासाठी नेटवर्क कंपनी अधिकारी उपस्थित राहत नसल्याने यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील सर्व पक्ष एकत्रित येत ग्रामस्थांसह आपापल्या परीने नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, मोबाइल कंपन्या त्यांनाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुढील आंदोलनात आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित येत, थेट मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहोत, असा इशारा शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख श्याम भोकरे यांनी या मोर्चेवेळी दिला.
गेले वर्षभर या सर्व कंपन्यांचे मिळत असलेले नेटवर्क सुमार दर्जाचे असून मोबाइल नेटवर्क कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुढील आंदोलन तीव्र होणार असून, वेळीच नेटवर्कमध्ये सुधारणा झाली नाही, तर संपूर्ण टॉवरची तोडफोड करण्यात येईल. या नुकसानीला जबाबदार कंपनीच असेल, असा गंभीर इशारा सेना तालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी दिला.