नांदगाव / मुरुड : काश्मीर येथील उरी या ठिकाणी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्याने वीस जवानांना वीर मरण पत्करावे लागले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटून मुरु ड व्यापारी असोसिएशनने बंदची हाक दिली होती. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून मुरुड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यावेळी व्यापारी असोसिएशनने आझाद चौकात शहीद जवानांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर एस.ए. हायस्कूल, अंजुमन इस्लाम हायस्कूल व नगरपरिषद शाळेमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित समस्त जनसमुदायाला मार्गदर्शन करताना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आंबुर्ले म्हणाले की, काश्मीर हा भारताचा भाग असून सुद्धा पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असून आमच्या सैनिकांवर वारंवार हल्ले करत आहे ही निंदनीय बाब असून याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आता बस झाले हे हल्ले थांबलेच पाहिजे. यासाठी भारत सरकारने पाकिस्तानशी युद्धच पुकारावे व कायमचा सोक्षमोक्ष लावून टाकावा ही जनतेची मागणी असून याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही बंदची हाक दिली आहे. तर नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून सरकारने हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली.प्रमोद भायदे यांनी आतंकवादी म्हणजे आपल्या देशाला लागलेली कीड आहे, याचा बीमोड केलाच पाहिजे यासाठी सर्व पक्षांनी मोदी सरकारला पाठिंबा देऊन पाकिस्तानवर हल्ला करावा अशी आग्रही मागणी केली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सर्व लोकांचा उत्स्फूर्त मोर्चा हा तहसील कार्यालयाजवळ नेण्यात आला. घोषणा देत सर्व प्रमुख व्यक्तींच्या माध्यमातून तहसीलदार योगिता कोल्हे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार कोल्हे यांनी आपले निवेदन शासनापर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले व मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आंबुर्ले, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, सुधाकर दांडेकर, बाबू सुर्वे आदी उपस्थित होते.
मुरुड तालुक्यात कडकडीत बंद
By admin | Published: September 23, 2016 3:30 AM