अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाचे स्मारक कधी होणार? CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:00 IST2025-04-12T17:58:47+5:302025-04-12T18:00:25+5:30
CM Devendra Fadnavis Raigad News: दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाचे स्मारक कधी होणार? CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
CM Devendra Fadnavis Raigad News: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी पोहोचले. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलभूमिपूजन केले होते. परंतु, त्यानंतर अनेक वर्षे या स्मारकाचे काम रखडले. यावरून विरोधकांनी सातत्याने भाजपावर टीकाही केली. रायगडावरील कार्यक्रमात बोलताना उदयनराजे यांनी काही मागण्या केल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक का रखडले आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडावर बोलताना सविस्तर माहिती दिली.
आपण छत्रपती शिवरायांचे मावळे, हार मानणार नाही
खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यापैकी पहिली मागणी म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात आहे. सर्वांना सांगायचे आहे की ते स्मारक सर्वोच्च न्यायालयात अडकले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे. परंतु, आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. हार मानणार नाही. उच्च न्यायालयात लढून स्मारकाचा मार्ग मोकळा करून घेऊ. कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले पाहिजे, हाच आमचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन करतो की, उदयनराजे भोसले यांनी केलेली आणखी एक मागणी महत्त्वाची आहे. दिल्लीतही छत्रपती शिवाजी महाराजांचे एक राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे. त्यासाठी आम्ही तुमच्याकडे येऊ. तुमच्या मदतीने दिल्लीत उचित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक बांधायचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.