लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा दिसून आला असून, हरयाणातदेखील त्यांनी विरोधकांना धूळ चारली. त्यामुळे आम्ही फ्लाइट आणि फाइटसाठी तयार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर हवाई दलाच्या सी-२९५ एअर क्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-३० एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत, हेच यातून स्पष्ट केले आहे.
‘दिबां’चा सन्मान करणार
आम्ही जे बोलतो ते करतो त्यानुसार स्थानिकांसाठी लढा देणारे नेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा सकारात्मकता दाखविली. मात्र, हे नाव नेमके कधी दिले जाणार, याबाबत बोलणे टाळले.
‘विरोधक टीका करत राहिले’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार नाही, अशी टीका आमच्यावर विरोधक करत होते. मात्र, आम्ही विमानतळ पूर्ण करून आज रनवेवर विमानाची यशस्वी चाचणीदेखील केली. येथे दोन रनवे व चार टर्मिनल असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती मिळेल.
अजित पवार गैरहजर
नवी मुंबई विमानतळाच्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. त्यांच्याऐवजी या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.
‘मविकास आघाडीला भ्रष्टाचारावर बोलण्याचा काय अधिकार?’
तुम्ही कोविड मधल्या खिचडीत, डेडबॉडीच्या बॅगमध्ये, कोविड सेंटरमध्ये, चारा घोटाळ्यात, शेण घोटाळ्यात, कोळशात पैसे खाल्ले त्यामुळे तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी मविआला केला.