नांदगाव: रायगड जिल्ह्यातील नांदगाव-मोरा बंदर येथे शनिवारी भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर मुंबईहून श्रीवर्धनच्या दिशेने जात होते. यावेळी मुरूड तालुक्यातील नांदगाव जवळच्या मोरा बंदर येथील खडकाळ भागात हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये तीन पुरूष व एक महिला वैमानिक होती. अपघातात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हा पाेलीस अधिक्षक संजय पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुरूडचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. याशिवाय, तटरक्षक दलाचे विशेष पथकही याठिकाणी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील चारही वैमानिकांना हेलिकॉप्टरने मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयात नेण्यात आले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.