किनारपट्टी प्रदूषणामुळे मत्स्यव्यवसाय धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:13 AM2021-04-04T00:13:12+5:302021-04-04T00:13:22+5:30
आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला तरी मागील काही वर्षात या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना आता मत्स्य दुष्काळाची चिंता वाटू लागली आहे.
जिल्ह्यातील खाडीकिनाऱ्यावर कोळी समाजाचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. या खाडीत मिळणारे बोंबील, ढोमी, मांदेली, घोळ, कलेंट, कोलंबी, शिंगाली, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या इत्यादी माशांचे प्रकार हे कोळी बांधवाना दैनंदिन रोजीरोटी मिळवून देतात. त्यामुळे तेथील कोळी बांधवानी माशांची निर्यातही सुरू केली आहे. खाडीपट्ट्यांतून व किनाऱ्यावरून मिळालेली मासळी देशांतील सर्व राज्यात पाठविली जात आहे. जलप्रदूषणामुळे या व्यवसायावर फार मोठे संकट आले आहे. मध्यंतरी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने मुंबई व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई रायगडच्या सागरी व खाडी परिसरातील १२५ माशांच्या जाती होत्या. त्यापैकी आता फक्त ७८ जाती शिल्लक आहेत. १० ते १५ वर्षांच्या काळांत येथे अतिरिक्त मासेमारी झाली. शिवाय मासेमारीसाठी पर्शियन जाळ्यांचा वापर तसेच एलइडी पद्धतीने मासेमारी करण्यात आली. यामुळे मासेमारी मोठ्या प्रमाणात झाली. माजगाव, मुरुड, नांदगाव, एकदा, राजापुरी, दिघी, तुरुंबबाडी, आदगाव, भरडखोल, बोर्ली, कोरली ही सर्व गावे दिघी पोर्टमुळे बाधित होणार आहेत. तर समुद्रकिनाऱ्यावरील खाडीलगतचा परिसर येथील मासे कमी झाल्याने येथील कोळी समाजावर उपासमारीचे सावट पसरले आहे.
मासेविक्रीसाठी अपुऱ्या सोयीसुविधा, डिझेल परतावा, होड्या बांधणी व दुरुस्तीसाठी आवश्यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, महिलांना मासेविक्रीसाठी अपुरी व्यवस्था असणे यातच तिसरी मुंबई घोषित केल्याने या भागात येणारे नवे प्रकल्प व येणारे कोस्टल रोड, बेसुमार खारफुटीची कत्तल यामुळे या क्षेत्रातील भागातून नाहीशा होणाऱ्या माशांच्या जाती याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.