किनारपट्टीवर प्रतिबंधात्मक आदेश

By admin | Published: March 12, 2017 02:36 AM2017-03-12T02:36:05+5:302017-03-12T02:36:05+5:30

होळी आणि धूलीवंदन या सणात रंगाचा बेरंग होऊ नये, याकरिता ११ ते १४ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत रायगडच्या किनारपट्टीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Coastal restrictive order | किनारपट्टीवर प्रतिबंधात्मक आदेश

किनारपट्टीवर प्रतिबंधात्मक आदेश

Next

- जयंत धुळप, अलिबाग
होळी आणि धूलीवंदन या सणात रंगाचा बेरंग होऊ नये, याकरिता ११ ते १४ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत रायगडच्या किनारपट्टीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी रायगड पोलीस करीत आहेत. किनारीपट्टीवर अतिवेगाने गाड्या चालविणे आणि मद्यपान करून समुद्राच्या पाण्यात प्रवेश करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हादंडाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
होळी आणि धूलीवंदन सण व त्यास लागून येणाऱ्या सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगड जिल्ह्याच्या १२२ कि.मी. अंतराच्या किनारपट्टीत येतात. भरती-ओहोटीबाबत स्थानिक नागरिक देत असलेल्या सूचना नाकारून, त्यांतील काही पर्यटक समुद्रात पोहायला जातात. मद्यप्राशनकरून समुद्रात पोहायला जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. यातून पर्यटक समुद्रात बुडण्यासारख्या अनेकघटनाही घडल्या आहेत. यासर्व गंभीर परिस्थितीला आळा घालण्याकरिता, तसेच सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

सागरीकिनारा सुरक्षेस प्राधान्य
पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यावर अतिवेगाने वाहने चालवितात.त्यामुळे इतर पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेण्यास अडथळा निर्माण होतो. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर वाहने पार्किंग केल्याने सागरीकिनारा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.तसेच सणासुदीच्या कालावधीत शांततेचा व निर्भय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक कारवाईचा एक भाग, हे पाऊल टाकण्यात आले आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्ची वाहने व किनाऱ्याच्या विकासकामासंदर्भातील बांधकामासाठीची वाहने वगळून अन्य वाहनांना समुद्रकिनारपट्टीवर अतिवेगाने चालविणे, समुद्रकिनाऱ्यावर वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी वाहने पार्किंग करणे यास, या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे.

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अबाधित राखण्याकरिता पोलीस सज्ज
1जिल्ह्यात यंदा २ हजार ७२७ सार्वजनिक, तर १ हजार २६० खासगी अशा एकूण ३ हजार ९८७ ठिकाणी होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. कोकण किनारपट्टीतील या अत्यंत महत्त्वाच्या अशा सणाकरिता चाकरमानी मुंबई-पुण्यातून शनिवारी सकाळीच आपापल्या गावी पोहोचू लागले आहेत. गाव मंडळांच्या माध्यमातून सार्वजनिक होलीकोत्सव आणि ग्रामदेवतांच्या पालख्यांची तयारीही पूर्ण झाली आहे.
2होळÞीच्या सणाकरिता कोकणात चाकरमान्यांना जाण्याकरिता मुंबईतून राज्य परिवहन मंडळाने विशेष बसेसचे तर कोकण रेल्वेने विशेष गाडीचे नियोजन केले आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या गाड्यांच्या संख्येचा विचार करून, महामार्गावर कोठेही वाहतूककोंडीची समस्या उद्भवू नये, याकरिता रायगड जिल्ह्यात पळस्पे(पनवेल) ते कशेडी(पोलादपूर) दरम्यान, रायगड पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

धूलीवंदनाच्या दिवशी अलिबाग समुद्रकिनाऱ्यांवर बैलगाडी शर्यती नाहीत
धूलीवंदनाच्या दिवशी अलिबाग समुद्रकिनाऱ्यांवर बैलगाडी शर्यती आयोजित करण्याची गेल्या ६० वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र, बैलगाडी शर्यतींवर बंदी आणावी, याकरिता एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याचा अंतिम निकाल लागलेला नाही. तोपर्यंत बैलगाडी शर्यतींना बंदी राहणार असल्याने यंदा सोमवारी धूलीवंदनाच्या दिवशी अलिबाग समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करता येणार नाही, अशी माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.

Web Title: Coastal restrictive order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.