- कांता हाबळेनेरळ : ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात झाली असून, नामफलक झाकले जात आहेत. मात्र, आचारसंहितेचा सर्वाधिक फटका नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी साळुंखे यांना बसला. त्यांना १५ आॅगस्टला ऐन कार्यक्रमाच्या वेळी ध्वजारोहण करता येणार नसल्याचे पत्र महसूल विभागाकडून प्राप्त झाले.नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ३१ आॅगस्ट रोजी असून त्यासाठी ३० जुलै रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. असे असताना १३ आॅगस्टपर्यंत नेरळ गावातील विकासकामांचे बहुतेक सर्व नामफलक हे कागदाने झाकले गेले नव्हते. त्याच वेळी मतदार यादी उशिरा प्रसिद्ध केल्यानेदेखील मोठ्या प्रमाणात आवाज उठविला गेला होता. त्या वेळी निवडणूक जाहीर झाल्यापासून १० दिवस ग्रामविकास अधिकारी या पदाबद्दलदेखील कर्जत पंचायत समितीकडून उलटसुलट माहिती दिली जात होती.त्याच वेळी ग्रामपंचायतीच्या १७ जागांचे आरक्षण जाहीर केल्यानंतर ते तब्बल दोन वेळा बदलले गेले. त्या सर्व बाबी लक्षात घेऊन माध्यमांनी निवडणूक यंत्रणेवर ताशेरे ओढल्यानंतर निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे. नेरळसारख्या मोठ्या आणि सुशिक्षित मतदार असलेल्या गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक एवढी निष्काळजीपणा दाखवून घेतली जात असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.मात्र, आता निवडणूक यंत्रणा पूर्ण सतर्क होऊन कामाला लागली असून १४ आॅगस्टपासून नेरळसारख्या शहरी भाग असलेल्या गावात फिरून ग्रामपंचायत कर्मचारी विकासकामांच्या पाट्या झाकण्याचे काम करीत आहेत.गुरुवारी १५ आॅगस्टची सुट्टी असूनदेखील ग्रामपंचायत कर्मचारी नामफलक झाकण्याचे काम करीत असून आचारसंहिता कडकपणे राबविली जाणार की नुसता दिखाऊपणा आहे हे नजीकच्या काळात लक्षात येणार आहे. मात्र, आचारसंहिता कडकपणे राबविली जाण्याचा सर्वात मोठा फटका नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे यांना बसला. त्यांना १५ आॅगस्टला चावडी कार्यालय येथे महसूल विभागाने झेंडावंदन करू दिले नाही.दोन दिवस नेरळ गावातचावडी नाका येथे नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी साळुंखे या झेंडा फडकविणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी प्रत्यक्ष कार्यक्रमात अचानक झालेल्या बदलाला निवडणूक आचारसंहिता असे कारण जाहीर करण्यात आले, असे असेल तरी नेरळ ग्रामपंचायतीला तसे महसूल विभागाने कळविणे गरजेचे होते. त्याच वेळी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपसरपंच अंकुश शेळके यांनी झेंडा फडकविला, त्या वेळी निवडणूक यंत्रणा कुठे होती? असा प्रश्नदेखील नेरळ ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.त्यामुळे कर्जत तहसील कार्यालयाने नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना झेंडा फडकवू न देण्याचा हा प्रयत्न आपण आचारसंहितेची अंमलबजावणी कडकपणे न केल्याने त्यावर पांघरूण टाकण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा नेरळ गावात सुरू आहे.मला कर्जत तहसील कार्यालयाकडून चावडी नाका येथे झेंडा फडकविला जाणार असल्याचे पत्र मिळाले आणि त्यामुळे गुरुवारी त्यासाठी तयारी पूर्ण केली, तर अन्य ठिकाणी कोणी झेंडा फडकविला याबाबत काही माहिती नाही किंवा त्याबद्दल आचारसंहिता अडथळा ठरू शकते काय? याबद्दलही सांगता येणार नाही.-माणिक सानप, मंडळ अधिकारीमला सांगण्यात आले की, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे आपल्याला ध्वजारोहण करू दिले नाही याबाबत काहीही बोलायचे नाही.- जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ
आचारसंहितेचा नेरळ सरपंचांना फटका, प्रशासनाने ध्वजारोहणास केली मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 2:47 AM