रायगड : कुलाबा किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. किल्ल्याचे ढासळलेले बुरुज आणि तटबंदीची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना पुरातत्त्व विभागाला देण्यात आल्या असल्याचे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. कुलाबा किल्ल्याची दुरवस्था झाल्याबाबत खासदार तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आॅनलाइन बैठक घेतली होती. त्यानुसार, शुक्रवारी कुलाबा किल्ल्याची पाहणी करण्यात आली. किल्ल्याचे ढासळलेले बुरुज आणि तटबंदी यांची दुरुस्तीसाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करावेत, अशा सूचना पुरातत्त्व विभागाचे अधिकारी राजेंद्र यादव यांना करण्यात आल्या. एका संरक्षक भिंतीचे काम मंजूर आहे, त्याचे कामा नोव्हेंबरपर्यंत करण्यात येईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे, किल्ल्यातील गोड्या पाण्याच्या विहिरींचे जतन करून त्याचा वापर करण्यासाठी योजना तयार करावी, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह उभारण्याबाबतही यावेळी ठरले. पर्यटनवाढीसाठी सोईसुविधा उभारणे गरजेचे आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्यात समन्वय साधून काम करण्यात येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. किल्ल्यावर कायमस्वरूपी वीज देण्यासाठी भुयारीमार्गे वीजवाहिन्या टाकण्यात येऊ शकतात, असे यादव यांनी सांगितले. कुलाबा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकवण्यात यावा, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सुचविले. त्यालाही मान्यता देण्यात आली. किल्ल्यावर माघी गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येतो. त्या दिवशी किल्ल्यात प्रवेश फी माफ करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली. त्याला यादव यांनी मान्यता दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने आदी उपस्थित होते.‘किल्ल्यावर गाइड उपलब्ध करून द्या’किल्ल्याच्या कामासाठी केंद्रीय पातळीवरून परवानगीची आवश्यकता लागणार आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्याशी संपर्क साधून सर्व अडचणी दूर करण्यात येतील, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. पर्यटकांना इतिहास माहिती व्हावा, यासाठी किल्ल्यावर गाइड उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.