तापमान घसरल्याने हुडहुडी, रायगड जिल्ह्यात थंडीचा कडाका; महामार्गांवर धुक्याची चादर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 10:50 AM2021-12-31T10:50:19+5:302021-12-31T10:50:41+5:30
Cold : पहाटे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यासह नागोठणे शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरत असल्याने रस्ते अदृश्य झाले आहेत. निसर्गाची विविध रूपे नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत.
- अनिल पवार
नागोठणे : मागील काही दिवसांत सर्वत्रच वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्याची चादर पसलेली दिसते. या दाट धुक्यामुळे नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. पहाटे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यासह नागोठणे शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरत असल्याने रस्ते अदृश्य झाले आहेत. निसर्गाची विविध रूपे नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत.
रायगड जिल्ह्यात सर्वत्रच तसेच रोहा तालुक्यासह नागोठणे शहर व परिसरात पहाटेपासून ९ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरत आहे. दाट धुक्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिक तसेच मॉर्निंग वाकला जाणाऱ्या लोकांना धुक्यामधून वाट शोधावी लागले. वातावरणातील हे बदलांमुळे खोकला, सर्दी व तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी थंडीमुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे.
सकाळी शेकोट्या, मॉर्निंग-वॉकवर भर
कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. तर हुडहुडी भरविणाऱ्या या थंडीत सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील वाढले असून गरम कपडे, कानटोपी, मफलरची मागणी वाढली आहे. दरम्यान, गुलाबी थंडीत सायकलिंग करणाऱ्यांची संख्या देखील वाढली.
चालकांची कसरत
आठ-नऊ वाजताही सगळीकडे अक्षरशः धुक्याची चादर पसरल्याचे दृश्य पाहायला मिळातो. या धुक्यामुळे वाहन चालकांना महामार्गावर वाहन चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे. मुंबई गोवा महामार्गांवर तसेच परिसरातील इतर राज्य मार्गांवर वाहनांनाही लाईट व इंडिकेटर चालू ठेवून संथगतीने जावे लागते.