अलिबाग : उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्याच्या दिशेने वाहणारे वारे हे अतिशय थंड आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानात कमालीची घट होऊन येत्या पाच दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्याच्या तापमानावरही त्याचा परिणाम झाला आहे. पहाटे सुमारे १४ अंश तर दिवसा १६ अंशापर्यंत तापमान खाली गेले आहे.रायगड हा उद्योगांचा जिल्हा असल्याने येथे स्टील निर्मितीसह केमिकलचे प्रकल्प मोठ्या संख्येने आहेत. आरसीएफ, एचपीसीएल, गेल, ओएनजीसी, एचओसी, आयपीसीएल अशा विविध कंपन्यांचे जाळे जिल्हाभर पसरलेले आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये तीन शिफ्टमध्ये उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील तापमान नेहमीच वाढलेले असते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला तरी, त्या थंडीचा विशेष फटका येथे जाणवत नाही. परंतु गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढल्याने रायगडकरांना मात्रचांगलीच हुडहुडी भरली असल्याचे दिसून येते.उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आल्याने राज्यही चांगलेच गारठले आहे. रायगड जिल्ह्याचे तापमान रात्री आणि पहाटे सुमारे १४ अंश तर, दुपारी १६ अंशापर्यंत खाली उतरत आहे. सध्या सुरू असलेल्या थंडीमुळे दिवसाही गारवा जाणवत आहे. रात्री आणि पहाटे त्या गारव्यामध्ये कमालीची वाढ होत असल्याने कडाक्याच्या थंडीचा फटका बसत आहे. वातावरणातील हे तापमान असेच पुढील पाच दिवस कायम राहणार असल्याने रात्री परिधान केले जाणारे स्वेटर, जॅकेट, मफलर, शाल अन्य गरम कपडे आता दिवसाही घातले जात आहेत. त्यावरून कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, माथेरान, श्रीवर्धन, महाड येथील रायगड किल्ला येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. नाताळ आणि थर्टी फर्स्टला केलेल्या नववर्षाच्या सेलिब्रेशननंतर पर्यटकांची गर्दी कमी होईल असे वाटले होते, मात्र गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली आहे.थंडी वाढल्याने स्वेटर, गरम कपडे खरेदीचा कल वाढल्याचे दिसून येते. बाजारपेठेतील दुकानांमधून नागरिकांची गर्दी दिसून येत होती. थंडीच्या कालावधीमध्ये गरम चहा पिण्याची मजा काही औरच असते. चहाच्या टपºयांवर वाफाळणारा चहा पिण्यासाठीही गर्दी होताना दिसत आहे.थंडीचा कडाका वाढल्याने गरम पेय पिण्याला पसंती दिली जात आहे. त्यामध्ये मद्याला जास्त पसंती दिली जात असल्याने कोल्ड्रिंक्स, थंड बीअर पिणाºयांची संख्या रोडावल्याचे सांगण्यात येते. जागोजागी रात्रीच्या शेकोट्या पेटवल्या जात आहेत, तर काही ठिकाणी पोपटी पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. त्यामध्ये स्थानिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने पोपटी पार्ट्या करत आहेत.
जिल्ह्यात थंडीचा कडाका तापमान १४ अंशापर्यंत खाली : थंडीच्या लाटेचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:30 AM