बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:29 PM2020-09-20T23:29:42+5:302020-09-20T23:30:12+5:30
सिझनल अॅलर्जीचे प्रमाण वाढले : दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
निखिल म्हात्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : ऋतू बदलल्याने जिल्ह्यात सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. विशेषत: लहान मुले यामुळे त्रस्त आहेत. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले, तरी दुर्लक्ष करणे अनेक वेळा घातक ठरू शकते. सर्दी, खोकला, कणकण, घसा खवखवणे या ‘सिझनल अॅलर्जी’ना वैद्यकीय भाषेत ‘हायनायिटज’ म्हणतात. या आजाराच्या रुग्णांत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे.
नाक, फुप्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असल्यामुळे सर्दी-खोकला ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणो आवश्यक असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ.सागर खेदु यांचे आहे. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत पवासाला सुरुवात झाल्यानंतर या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जेव्हा ऋतू बदलतो, त्यावेळी खोकला येणे, नाकातून पाणी यणे, सर्दी, डोके दुखणे, अंग दुखणे आदी त्रास डोकं वर काढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती चांगली नसल्याने याचा जास्त त्रास होतो. ब्राँकायटिससारखे फुप्फुस आणि श्वसननलिकेचे आजारही जडतात. अशा वेळी बाहेरचे खाणे टाळावे. जास्तीतजास्त गरम पाणी प्यावे. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा, प्रवास करीत असताना मास्क, रुमाल व स्कार्पचा वापर करावा, याबरोबरच दररोज व्यायाम करावा असे सांगितले.
घसातज्ज्ञ डॉ.अंकुश शिंदे यांनी गर्दीच्या ठिकाणी, बसमध्ये कोणी शिंकला, खोकला तर त्याचाही संसर्ग होऊ शकतो. जंतुसंसर्ग होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे, हवेचं प्रदूषण, पावसाळ्यात रस्त्यावरील सतत उडणारी धूळ, बांधकामांमधील वाळू, पीओपी या वस्तूंची ज्यांना अॅलर्जी असते, त्यांच्या घसा आणि नाकावर परिणाम होतो असे सांगितले.
दररोजचे १० ते १५ रु ग्ण
च्गेल्या काही दिवसांपासून सकाळी वाढणारे तापमान तर काही वेळानंतर पडलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी असलेले १० ते १५ रुग्ण रोज दवाखान्यात उपचारासाठी येते आहेत, असे डॉ.राजीव तंबाळे यांनी सांगितले.