महाड : शिवसेना यापुढे स्वबळावर लढणार आहे. याचे रणशिंग फुंकले आहे. मावळे समोर आहेत. आता लढाईची सुरुवात झालीय. देशाचं वातावरण आणि राजकारण बिघडत चालले आहे. राम मंदिरासाठी जमवलेल्या विटा या मंदिरासाठी नव्हत्या तर तुमच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठीच्या पायऱ्या होत्या, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज महाड येथे मेळावा झाला. यावेळी ठाकरे बोलत होते. 2019 निवडणूक येणार आहे. यात काय होणार याची नाही तर लोकांचं काय होणार, देशाचे काय होणार याची चिंता असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांशी लोकं कशी राजकारण खेळली, हे मी जवळून पाहिलं आहे. हा पक्ष पुढे कसा न्यायचा हे शिवसेनाप्रमुखांनी मला शिकवलं आहे. एकदा भाजपाने सांगावे की राम मंदिर जुमला होता, मग २८० वरून २ पर्यंत आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
लोकांपर्यंत जा आणि विचारा की मोदींच्या योजनेचा त्यांना काय फायदा झाला? थापाड्यांची आम्हाला गरज नाही. मला खोटं बोलून सत्ता नको, खोटं मतही नकोय. आम्ही पाण्यासाठी फिरतोय आणि मोदी देशाटनं करतायत. आता पुन्हा गाजराच्या पिकाला पाणी देणार आहात का ? निवडणुका येताच भ्रमाचे भोपळे, गाजरं गावागावात वाटली जातील. शिवसैनिकांचं प्रेम ही माझ्यासाठी केवढी मोठी सत्ता आहे. सत्तांध हत्तीवर शिवसेना अंकुश मारणारच. यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहीजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.