अलिबाग : पहिल्या महायुद्धापासून अनन्यसाधाराण शौर्यांची परंपरा अबाधीत राखलेल्या आणि आजही भारतीय लष्करात देशसेवेसाठी कार्यरत ३०० जवानांच्या महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून नावलौकिक प्राप्त ‘फौजी आंबवडे गाव विकासापासून वंचित’ या विशेष वृत्तातून शासनाची निष्क्रीयता ‘लोकमत’ने सर्वांसमोर मांडली. यानंतर शासकीय यंत्रणेत मोठीच धावपळ उडाली. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी फौजी आंबवडे गावाबाबतचे आपले अहवाल तत्काळ पाठवावेत, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेआहेत.आपण स्वत: फौजी आंबवडे गावांत जाऊन पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माजी सैनिकांच्या कल्याणाकरिता केंद्र सरकार एकीकडे मोठा डांगोरा पिटत असताना, राज्यात माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार गंभीर नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.रायगडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर प्रांजल जाधव यांच्याकडे रायगडसह पालघर, ठाणे, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या तब्बल सहा जिल्ह्यांचा पदभार आहे. शासन जिल्हानिहाय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी देऊ शकले नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.दरम्यान, फौजी आंबवडे गावांच्या अक्षम्य गंभीर परिस्थिती ‘लोकमत’च्या वृत्ताच्या अनुषंगाने माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून संवेदनशीलतेने या परिस्थितीकडे पाहून फौजी आंबवडेगावांच्या विकासाकरिता विशेष निधी उपलब्ध करून देऊन, थेट आपल्या देखरेखीखाली गावाची विकास योजना राबवावी, अशी विनंती केली आहे.
जिल्हाधिकारी देणार फौजी आंबवडेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:29 AM