अलिबाग - बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. तृणधान्याखालील क्षेत्र हे आगामी दोन वर्षात ५ हजार हेक्टर होण्यासाठी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि शेतकरी यांच्या सहकार्याने विशेष भर देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, समन्वय अधिकारी स्मार्ट प्रकल्प सतीश बोऱ्हाडे, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, प्रकल्प उपसंचालक आत्मा भांडवलकर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना किशन जावळे म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीनुसार २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. या अंतर्गत तृणधान्याचे उत्पादन वाढविणे, त्याच्या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढविणे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तृणधान्याच्या वापर व उत्पादन वाढीसाठी रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. या वर्षभरात राबविलेल्या कार्यक्रमांमुळे तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढले आहे.
तसेच मोठ्या प्रमाणात तृणधान्यावरील प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढले आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप हब आहे. राज्यात नवनवीन उद्योजक तयार होत आहेत. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योग सुरू करावेत तसेच शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, या असे सांगून जिल्हाधिकारी जावळे यांनी कृषी विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.