रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा येथील दोन डाकघर कार्यालये, चार राष्ट्रीयकृत बँका,जिल्हा मध्यवर्ती बँक, पतसंस्था, सहकारी बँक अशा सर्वच ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट सेवा असून ही सेवा गेले दोन आठवडे बंद असल्याने वरील ठिकाणी आर्थिक व्यवहार करण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. आता येथील ग्रामस्थांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाकडे साकडे घातले आहे.येथील बीएसएनएलच्या दूरध्वनी केंद्राला गेले अनेक महिने घरमालकाने भाडे थकल्याने कुलूप घातले आहे. त्यामुळे दूरध्वनी केंद्रातील बिघाड दुरुस्त करणे शक्य नाही. या दूरध्वनी केंद्रात सुमारे ५५० ग्राहक व ब्रॉडबॅण्ड सेवा घेणारे ग्राहक असले तरी या सर्वांना शोभेची वस्तू म्हणूनच पहावे लागत आहे. या बंद पडलेल्या इंटरनेट सेवेचा गॅस बुकिंग, डाकघरातले व्यवहार, विद्युत देयके, निवृत्तधारकांचे निवृत्तीवेतन, ग्रामपंचायती कामे, एटीएम सेवा विस्कळीत झाली असून लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. या होत असलेल्या त्रासाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना विधानपरिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी पत्र देऊन चौल-रेवदंडा परिसरातील ही समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
इंटरनेट सेवेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:46 PM