वसाहतींना अवजड वाहनांचा गराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 12:20 AM2015-12-29T00:20:58+5:302015-12-29T00:20:58+5:30
कळंबोलीसह खांदा वसाहत आणि कामोठे वसाहतीला अवजड वाहनांनी गराडा घातला आहे. याचा सर्वाधिक त्रास कळंबोलीकरांना होत असताना कळंबोली वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत
पनवेल : कळंबोलीसह खांदा वसाहत आणि कामोठे वसाहतीला अवजड वाहनांनी गराडा घातला आहे. याचा सर्वाधिक त्रास कळंबोलीकरांना होत असताना कळंबोली वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वसाहतींतील रस्त्यांना पार्किंगचे स्वरूप आले असून, जिकड तिकडे ट्रक, कंटेनर्स उभे दिसत आहेत.
कळंबोली वसाहतीच्या बाजूला लोह-पोलाद मार्केट आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालाची चढ-उतार होते. त्याचबरोबर बाजूला पनवेल-सायन आणि एनएच4 बी हे महामार्ग जातात. परिणामी या परिसरात अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते.
काही वर्षांपूर्वी वाहने उभे करण्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. दोन गटांत झालेल्या वादाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे कळंबोलीत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या घडीला ट्रक, कंटेनर, टँकरला नो इंट्री आहे. असे असतानाही वसाहतीत मोठ्या प्रमाणात अशी वाहने घुसखोरी करीत आहेत. त्याचबरोबर वसाहतींत गॅरेज थाटण्यात आली आहेत.
रोडपाली परिसरातील जवळपास सर्व रस्ते अवजड वाहनांनी हायजॅक करण्यात आले आहेत. भरधाव वेगाने कंटेनर येत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. (वार्ताहर)
अवजड वाहनांवर नियमित कारवाई केली जाते; मात्र मला निश्चित आकडा सांगता येणार नाही. खांदा वसाहत, कामोठे वसाहतीत काय परिस्थिती आहे ती पाहतो आणि मग कारवाई करतो. नो एंट्रीत प्रवेश करणाऱ्या वाहनांवर आपण कारवाई करू
- दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक,कळंबोली वाहतूक शाखा