प्रांत कार्यालयात रंगली संगीत खुर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:26 AM2020-10-10T00:26:15+5:302020-10-10T00:26:18+5:30
शारदा पोवार यांची मॅटमध्ये धाव; प्रशांत ढगे यांना सोडावी लागली खुर्ची
रायगड : : अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयात सध्या संगीत खुर्चीचा कार्यक्रम अनुभवास मिळाला. शारदा पोवार यांच्या जागी प्रशांत ढगे यांची सरकारने बदली केली होती. त्यानुसार, ढगे यांनी कार्यालयात येऊन कामकाज हाती घेतले असतानाच, शारदा पोवार यांनी मॅटमध्ये धाव घेतली. आणि बदलीबाबत स्टे मिळविला. त्यामुळे ढगे यांना खुर्ची सोडावी लागली आहे.
शारदा पोवार या अलिबाग प्रांताधिकारी या पदावर अडीच वर्षे काम करीत आहेत. सरकारने राज्यातील उपविभागीय अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची नुकतीच बदली प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग येथील विशेष भूसंपादन अधिकारी प्रशांत ढगे यांची अलिबाग प्रांताधिकारी म्हणून बदली करण्यात आली. प्रशांत ढगे यांनी सरकारी निर्णयानुसार, अलिबाग येथे येऊन सर्व सोपस्कार पूर्ण करत अलिबाग प्रांताधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, शासनाने ढगे यांची बदली केलेली असताना, शारदा पोवार यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात मॅटमध्ये धाव घेतली. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नसताना, सरकारने अचानक बदली केल्याची कैफियत त्यांनी मॅटसमोर मांडली. मॅटने शारदा पोवार यांची बाजू ग्राह्य धरत त्यांच्या बाजूने निकाल दिला. पोवार यांना अलिबागच्या प्रांताधिकारी पदावर कायम ठेवण्याचे आदेश मॅटने दिले. त्यामुळे ढगे यांनी पदभार स्वीकारूनही त्यांना आपली खुर्ची काही कालावधीतच सोडावी लागली आहे.
त्याचप्रमाणे, मी पदभार स्वीकारल्याबाबत मॅटच्या निर्दशनास आणून दिलेले नाही. या प्रकरणी २९ आॅक्टोबरला माझी मॅटमध्ये सुनावणी होणार आहे, असे प्रशांत ढगे यांनी स्पष्ट केले. शारदा पोवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘माझी बदली रद्द नाही’
सरकारच्या निर्णयानुसार मी अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयाच पदभार स्वीकारला होता. त्याच कालावधीत शारदा पोवार यांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने बदलीला स्टे दिला आहे. मात्र, माझी बदली अद्याप रद्द केलेली नाही. पोवार यांनी अलिबाग येथे राहावे, पण प्रांताधिकारी पदावर असा उल्लेख आदेशात केलेला नाही. पोवार यांनी त्याच खुर्चीत बसण्याआधी जिल्हाधिकारी अथवा कोकण आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक होते, असे प्रशांत ढगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.