पोलादपूर : शिवसेनेचे आ.प्रताप सरनाईक यांची ईडीची चौकशी सुरू असताना, मीडियासमोर चुकीचे वक्तव्य करत मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासारखे धारातीर्थी पडणार नाही, मी बाळासाहेबांचा सच्चा मावळा आहे, असे वक्तव्य करत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा अपमान केला. या प्रकरणी सरनाईक यांनी नरवीर तानाजी याची भूमी असलेल्या सिंहगड किंवा उमरठ येथे येऊन नतमस्तक होऊन माफी मागावी, अन्यथा राज्यात जनआंदोलन उभारू, असा इशारा राजिप सदस्य तथा नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी दिला आहेशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती उमरठ, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे संस्था (रजि), महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्या वतीने आज रविवार रोजी उमरठ येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सवंगडी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल प्रताप सरनाईक यांनी चुकीचे वक्तव्य केल्यामुळे या वक्तव्याचा राज्यात सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सुभेदार नरवीर यांची कर्मभूमी असलेले उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समितीच्या वतीने आंदोलन केले. यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांचा जयजयकार करण्यात आला. त्याचप्रमाणे, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’च्या गजरात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे, उपाध्यक्ष इंद्रजीत कळंबे, कार्याध्यक्ष जयराम मोरे, रामदास कळंबे, सरपंच चंद्रकांत गजानन कळंबे, अनिल मालुसरे, विठ्ठल कळंबे, संजय कळंबे, ज्ञानदेव कळंबे नंदू कळंबे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चुकीच्या वक्तव्याबद्दल आ. प्रताप सरनाईक यांनी माफी मागावी, अन्यथा जनआंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 11:38 PM