वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे बालभारती प्रकाशनाद्वारे इयत्ता पहिली ते बारावीची सर्व विषयांची मिळून जवळपास चार कोटी पाठ्यपुस्तके छापून वितरित करते. पुस्तकांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्यात सध्या नऊ भांडारे आहेत.यापैकीच एक भांडार पनवेल मध्ये असुन याठिकाणाहून 36 लाख पुस्तकांच्या वितरणाला सुरुवात झाली आहे.
रायगड,ठाणे आणि पालघर या जिल्हा परिषदांसह ठाणे ,नवी मुंबई,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली,मीरा भाईंदर,भिवंडी निजामपूर आदी पालिकेच्या शिक्षण विभागाला पनवेल मधुन पुस्तकांचे वितरण केले जाते. शासकीय शाळा शिक्षणाधिकाऱ्याकडे पुस्तकांची मागणी करतात.त्यानंतर शिक्षणाधिकारी एमपीएससीला याबाबत माहिती देतात त्यानंतर बालभारती या पुस्तकांचे वितरण करते. 15 मे ला या पुस्तकांचे वितरण सुरु झाले आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्य. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके हातात पडतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच महानगरपालिका ,जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15जूनला पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते.
बालभारतीचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. बालभारती या नावानेही ती ओळखली जाते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, गुजराती, सिंधी, अरबी, बंगाली, तमिळ या दहा भाषांमधील ही पुस्तके आहेत.
15 मे रोजी पुस्तकांच्या वितरणाला सुरुवात झाली आहे.या महिन्या अखेर पनवेल येथून 36 लाख पुस्तकांच्या प्रति वितरित झालेल्या असतील.-पी एम सुपे (व्यवस्थापक,बालभारती पनवेल)