भरतीच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या संरक्षक बांधबंदिस्तींच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:58 PM2023-08-28T17:58:32+5:302023-08-28T17:59:33+5:30
उधाणाच्या पाण्याने बांधांनाच गेलेल्या खांडीमुळे समुद्राचे खारे पाणी भातशेतीत शिरल्याने शेकडो एकर शेतजमीन नापीक झाली आहे.
मधुकर ठाकूर
उरण : शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर खारलॅण्ड विभागाने खोपटा विभागाच्या समुद्र किनाऱ्यावरील उध्वस्त झालेली संरक्षक बांधबंदिस्तीं तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती खारलॅण्ड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.
खोपटा हद्दीतील समुद्र किनारी असलेल्या अनेक बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्याने उध्वस्त झाली आहेत. उधाणाच्या पाण्याने बांधांनाच गेलेल्या खांडीमुळे समुद्राचे खारे पाणी भातशेतीत शिरल्याने शेकडो एकर शेतजमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेकडो एकर भातशेती ओस पडत चालली होती.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या भातशेतीचे नुकसान टाळण्यासाठी खोपटा विभागाच्या समुद्र किनाऱ्यावरील उध्वस्त झालेली संरक्षक बांधबंदिस्तींची दुरुस्ती करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली होती.
शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर खारलॅण्ड विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे उध्वस्त झालेल्या संरक्षक बांधबंदिस्तींची पाहणी केली होती.समुद्राचे खारे पाणी शेतीत जाऊ नये यासाठी खोपटा येथील समुद्र किनाऱ्यावरील काही बांधबंदिस्तींच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती खारलॅण्ड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.