मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना देणार मार्गदर्शक सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 11:26 PM2020-05-03T23:26:13+5:302020-05-03T23:26:15+5:30
सध्याच्या घडीला संशोधन केंद्रात नऊ टन भात बियाणे उपलब्ध असल्याचे डॉ. सुरेश दोडके यांनी सांगितले. शेतकºयांनी शेत बियाणांसाठी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
वैभव गायकर
पनवेल : शहरातील खार जमीन संशोधन केंद्रात मान्सूनपूर्व कामांच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणारे पनवेलमधील खार जमीन संशोधन केंद्र महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहे. शेती व मत्स्य उद्योगांसंबंधित संशोधन करणारे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उत्तर कोकण किनारपट्टीवरील हे महत्त्वाचे केंद्र आहे. गतपावसाळ्यात केंद्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. मत्स्यशेतीचेही मोठे नुकसान झाले होते. त्यादृष्टीने संशोधन केंद्राच्या माध्यमातून यंदा उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत.
लॉकडाउनचा केंद्रालाही फटका बसला असून शेतीविषयक रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे डॉ. सुरेश दोडके यांनी दिली. लॉकडाउनमुळे मनुष्यबळाअभावी मत्स्यशेतीदेखील अडचणीत आल्याचे मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी सांगितले. खाडीच्या पाण्यामुळे क्षारमय झालेल्या जमिनीवर शेती तसेच मत्स्यविषयातून उत्पादन वाढवण्याकरिता वेगवेगळ्या भाताच्या जाती विकसित करणे, एकात्मिक शेतीपद्धतीबाबत संशोधन करणे, मत्स्य पिंजरा, एकात्मिक मत्स्यसंवर्धन प्रकल्प, मत्स्य खाद्य, प्रजैविक वापर, जिताडा मत्स्यसंवर्धन व इतर अनेक महत्त्वाचे व शेतकरीभिमुख संशोधन व विस्तार कार्य केंद्रावर राबवले जात आहे. सध्या देशभरात लॉकडाउन असतानाही कृषी विद्यापीठ व त्याअंतर्गत संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना देऊन उत्पादनासह आर्थिक उत्पन्न कशाप्रकारे टिकवून ठेवता येईल, याबाबतीत मार्गदर्शन करीत आहे.
मत्स्य व्यवसाय व कृषी क्षेत्रास केंद्र तसेच राज्य शासनाने अत्यावश्यक बाब म्हणून सूट देऊन यातील महत्त्वाच्या कामांना बंधन न घालता सामाजिक अंतर व कोविडची नियमावली पाळून चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी तसेच संशोधन केंद्र्राची पावसाळ्यापूर्वीची कामे पार पाडू शकणार आहेत. सध्याच्या घडीला संशोधन केंद्रात नऊ टन भात बियाणे उपलब्ध असल्याचे डॉ. सुरेश दोडके यांनी सांगितले. शेतकºयांनी शेत बियाणांसाठी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र
क्षार जमिनीवर संशोधन करणारे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र पनवेलमध्ये आहे. केंद्राची स्थापना १९४३ मध्ये कृषी संशोधन केंद्र म्हणून झाली. १९५९ मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या योजनेतून अंशत: योजना-१ आणि योजना-१ यामधून पुरविण्यात आल्या. केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगाव या दोन प्रक्षेत्रामध्ये विभागण्यात आले आहे.