कष्टकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:02 AM2019-01-28T00:02:31+5:302019-01-28T00:02:36+5:30
सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
अलिबाग : समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. या सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात आले. निवृत्त अॅडमिरल एल. रामदास, स्वातंत्र्य सैनिक यांची भेट घेऊन चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन करताना जिल्हा नियोजन समितीने २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी २६५ कोटी ५ लाख रु पयांचा जिल्हा विकास आराखडा तयार केला आहे. सरकारच्या भात खरेदी केंद्रांवर गेल्या वर्षी ५८ हजार क्विंटल तर यंदा ६३ हजार क्विंटल इतकी खरेदी झाली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून रायगड जिल्ह्यातील ११९ हजार १९६ शेतकºयांना ४३ कोटी ६३ लाख २३ हजार रु पयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला, तर जिल्ह्यात पाच हजार ३८० जणांना घरकूल योजनांचा लाभ देण्यात सरकार यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र मातून २२७ योजनांचा कृती आराखडा सरकारने मान्य केला आहे. त्यासाठी १७२ कोटी ३८ लाख रु पयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर मत्स्य केंद्रांचा विकास हाती घेण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी शेतकºयांचे उत्पन्न हे २०२२ पर्यंत दुप्पट होण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. अलिबागच्या सुप्रसिद्ध पांढºया कांद्याला जागतिक ओळख निर्माण करून देण्याकरिता कृषी विद्यापीठामार्फत ‘आत्मा’ योजनेमधून भौगोलिक मानांकन देण्याचे काम सुरू झाले आहे, त्यामुळे अलिबागचा पांढरा कांदा हा जागतिक स्तरावर जाईल, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच खारभूमीच्या ९५ योजनांच्या नूतनीकरणाची कामे नाबार्ड निधी, राज्यनिधी, राष्ट्रीय चक्रि वादळ आपत्ती निवारण प्रकल्पाद्वारे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत पाच कोटी २४ लाख ८४ हजार रु पयांचा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत पाच हजार २७१ लाभार्थी कामगारांना दोन कोटी ६३ लाख ३६ हजार ४०० रु पये निधी वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात ६५ कोटी ३३ लाख रु पये खर्च करून समाधानकारक परिवर्तन होताना दिसत आहे.
शानदार संचलन
प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या तालबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. या संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक एम. डी. बाविस्कर यांनी केले. या संचलनात १६ प्लाटून आणि नऊ चित्ररथांनी सहभाग घेतला. या चित्ररथांमध्ये मुद्रा बँक योजना व एव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीच्या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
पर्यटकांच्या उपयुक्ततेसाठी मोबाइल अॅप
पर्यटकांच्या उपयुक्ततेसाठी एक मोबाइल अॅप खुले करीत असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले, या वेळी त्यांच्या हस्ते जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलांना मदत व बचाव साहित्याचे वाटपही करण्यात आले. जिल्ह्यात रेल्वे सुविधांच्या बळकटीकरणाला बळ देण्यात आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही आकारास येत आहे. या शिवाय, जलमार्ग वाहतुकीसाठी सोई उपलब्ध करण्यात येत आहेत. येत्या काळात मुंबई महानगर विकास धोरणात रायगड जिल्ह्यापर्यंत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महामुंबई या नव्या विकास क्षेत्रात रायगड जिल्हा वेगाने पुढे जाईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
मरुडमध्ये प्रभात फेरी
आगरदांडा : मुरुड तालुक्यात तहसील, सर्व ग्रामपंचायत, शाळांमध्ये शनिवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य- डॉ. शाहिदा रंगुनवाला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबंद प्रभात फेरी मुरु ड बाजारपेठ येथील आजाद चौकातपर्यंत काढली.
विशेष कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान
शासकीय समारंभाचे निवेदन करणाºया निवेदिका श्रीमती किरण करंदीकर, पोलीस दलातील मुख्यालयातील सहायक फौजदार प्रदीप गोविंद पाटील, गोरेगाव पोलीस निरीक्षक अनिल गंगाधर टोपे, वनवासी विकास सेवा संघ मु. पो. उसरोली-मजगाव, ता. मुरु ड-जंजिरा यांना जिल्हा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार, तसेच अमरेंद्र कुळकर्णी, नवीनकुमार गेरोला यांना उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार, प्रायव्हेट ज्युनिअर कॉलेज पेण यांना राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत प्रथम पुरस्कार, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने डॉ. राजेंद्र पाटील- पोलादपूर, डॉ. राहुल वारंगे- महाड, गुरुनाथ साठेलकर- खालापूर, दर्पण दरेकर- पोलादपूर, राजेश बुटाला- महाड, सागर मेस्त्री- महाड, महेश सानप- रोहा, सुनील भाटिया- महाबळेश्वर, संजय पार्टे- सातारा, राहुल समेळ- ठाणे, सचिन गायकवाड- दापोली, जयपाल पाटील- अलिबाग यांना शोध व बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार दादासाहेब सोनटक्के, साईनाथ पवार, विष्णू धाक्र स यांना देण्यात आला.
महाडमध्ये चांदे क्रीडांगणावर ध्वजारोहण
महाड : महाडमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते चांदे क्रीडांगणावर शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी तहसीलदार चंद्रसेन पवार, पंचायत समिती सभापती सपना मालुसरे, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एन. बिहर, शहर पोलीस निरीक्षक शैलेश सणस, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील आदींसह नागरिक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाकडून मानवंदना देण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी कवायतीदेखील सादर केल्या. महाड पंचायत समितीच्या आवारात सभापती सपना मालुसरे यांच्या हस्ते तर नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष वजीर कोंडिवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नागोठण्यात विकासकामे
नागोठणे : शहरात विविध विकासकामे करण्यात आली असून उर्वरित काही कामे प्रगतिपथावर आहेत. विभागातील काही कंपन्यांकडून सीएसआर फंडातून सुद्धा कामे चालू आहेत. शहराच्या प्रलंबित शुद्ध पाणीपुरवठा योजनेबाबत असलेल्या त्रुटी पूर्ण करून ही योजना लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणात पार पडला. शहराच्या सांडपाणी व्यवस्थापन योजनेसाठी १५ कोटी रु पयांचा निधी उपलब्ध होत आहे. याशिवाय शहरातील कोंडूळ तलाव आणि शृंगार तलावाच्या संवर्धनासाठी १ कोटी ९६ लाख रु पयांचा निधी उपलब्ध झाला असून मशिदीच्या तलावासाठी १ कोटी रु पयांचा निधी प्रस्तावित आहे. जनतेच्या मागणीनुसार शहराच्या बाहेर डंपिंग ग्राउंड हलविण्यात आल्याचे धात्रक यांनी स्पष्ट केले.
खोपोलीत जनजागृती
खोपोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली व खालापूर शाखेच्या वतीने गणतंत्र दिनानिमित्त महिला सबलीकरण व संविधान बांधिलकी या विषयांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आली. पहिले पथनाट्य शीळफाटा येथील आनंद शाळा येथे तर दुसरे पथनाट्य विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात संपन्न झाले. तिसरे पथनाट्य बाबासाहेब आंबेडकर पुतळा खोपोली येथे सादर झाले.