नुकसानग्रस्तांना देणार भरपाई , महसूल यंत्रणेने केले पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 04:39 AM2018-07-12T04:39:48+5:302018-07-12T04:40:15+5:30
संततधार पर्जन्यवृष्टीनंतर बुधवारी पावसाचा जोर ओसरला. मात्र, गेल्या चार दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्याचे बरेचसे नुकसान झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्तांना सरकारी मदत मिळणार आहे.
- जयंत धुळप
अलिबाग - संततधार पर्जन्यवृष्टीनंतर बुधवारी पावसाचा जोर ओसरला. मात्र, गेल्या चार दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्याचे बरेचसे नुकसान झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्तांना सरकारी मदत मिळणार आहे.
बुधवारी माणगावमध्ये पुरात वाहून जाऊन दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना एकूण आठ लाख रुपये सरकारी आर्थिक मदत देण्यात आली असल्याचे महसूल यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले. अतिवृष्टीत सात मोठी दुधाळ जनावरे आणि दोन लहान जनावरे, अशी एकूण नऊ जनावरे मृत्युमुखी पडली असून, त्यासंबंधित शेतकऱ्यांना एकूण ३० हजार रुपयांची सरकारी मदत देण्यात आली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यात ४७४ घर-गोठ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये ३४ पक्की घरे, ४२६ कच्ची घरे आणि १४ गोठ्यांचा समावेश आहे. याचबरोबर जिल्ह्यात एकूण ११२ इमारती मालमत्तांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सात सार्वजनिक मालमत्तांचे दोन लाख रुपयांचे तर १०५ खासगी मालमत्तांचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पूरबाधित पाच कुटुंबांना पाच लाख रुपयांची आर्थिक सरकारी मदत देण्यात आली आहे.
महाडमध्ये गेल्या तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व सावित्री नदी पुरामुळे शहरातील सुकटगल्ली परिसरातील १९ कुटुंबांचे चार लाख ५० हजार ५६० रुपयांचे, बाजारपेठेतील सहा कुटुंबांचे ६१ हजार, भीमनगरमधील नऊ कुटुंबांचे ७२ हजार, कोटेश्वरी तळे मोठी गल्ली परिसरातील चार कुटुंबांचे सहा हजार ५००, तर नवेनगरमधील एका कुटुंबाचे दोन हजार रुपयांचे, असे एकूण ३९ कुटुंबांचे पाच लाख ९२ हजार ६० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. महसूल यंत्रणेने पंचनामे केले असून, शासकीय नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरडग्रस्त गावांना भेटी देऊन केली प्रत्यक्ष पाहणी
रस्त्यावर माती येणे, पूल खचणे, घरांमध्ये पाणी शिरणे, झाड पडणे यासारख्या घटनांना तत्काळ प्रतिसाद द्यावा. पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्या. घडलेल्या घटनांची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात (०२१४१-२२२११८/२२२०९७) द्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी प्रशासकीय यंत्रणेस दिले आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातील उप विभागीय अधिकारी, तहसीलदार व अन्य यंत्रणेने दरडग्रस्त गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व तेथील रहिवाशांशी संवाद साधून सुरक्षा उपायाबाबत चर्चा केल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
पावसाचा जोर बुधवारी कमी झालेला असला तरी आगामी तीन दिवसांत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहावे, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत होणारी वाढ परिणामी नदीकिनाºयावरील, सखल भागातील तसेच दरडग्रस्त गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी पाहणी करावी. डोंगरावरील मनुष्यवस्तीच्या भागातील गावांमध्ये जमिनीला भेगा पडणे, जमिनीखालून मातीमिश्रित पाणी येणे, घरांच्या भिंती खचणे, पोल, झाड वाकडे होणे, डोंगरमाथ्यावर पाणी साचून राहणे, मोठे दगड हलणे या परिस्थितीची तत्काळ पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही आदेश डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
गरज भासल्यास दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, तसेच आपापल्या परिसरातील धोकादायक, जुन्या पुलांची पाहणी करून आवश्यकतेनुसार पुलांवरील वाहतूक सुरू किंवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा. वाहतूक बंद करावयाची असल्यास पर्यायी रस्त्यांची पाहणी करून वाहतुकीची व्यवस्था करावी. धोकादायक पुलांचे कठडे वाहून गेले असल्यास, पूल खचला असल्यास तेथे दिशादर्शक फलक, झेंडे लावण्यात यावे. सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचाºयांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुख्यालय सोडून जाऊ नये, नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवावेत, असेही स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.