डीवायएसपी विरोधात आयोगाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 04:58 AM2018-04-25T04:58:37+5:302018-04-25T04:58:37+5:30
मानवी हक्क आयोग : ३ मे रोजी सुनावणी
बिरवाडी : महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांच्या विरोधात मानवी हक्क आयोगाकडे दाखल तक्रारीवर ३ मे २०१८ रोजी मुंबईत मानवी हक्क आयोगासमोर सुनावणी होणार असून, या सुनावणीकरिता हजर राहण्याचे आदेश आयोगाचे प्रभारी अध्यक्ष भगवंतराव डी. मोरे यांनी दिले आहेत.
महाड तालुक्यातील बिरवाडी कुंभारवाडा येथील महिला प्रभाती नभगण स्वाई यांनी महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडे ही लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये, चीटफंड घोटाळ्यातील ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याकरिता २२ आॅगस्ट २०१६ रोजी महाड शहरातून कंपनीविरोधात मोर्चा काढून कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन सादर केले. या निवेदनावर काय कारवाई केली, या संदर्भातील अहवालासाठी २५ दिवसांनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनावणे यांच्या कार्यालयात भेटीकरिता पाच तासांची प्रतीक्षा, त्यानंतर समाधानकारक उत्तर न देता, गैरशब्दांचा वापर या कारणास्तव सोनावणेंविरोधात स्वाई यांनी २८ सप्टेंबर २०१६ रोजी उपोषण केले. त्याची दखल माध्यमांनी घेतल्याने सोनावणे यांच्या अंतर्गत चौकशीचे आश्वासन दिले. या सर्व घटनांचा राग धरून ३० डिसेंबर २०१६ रोजी सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आयोगाने चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी स्वाई यांनी केली होती.
महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांच्या कार्यकाळामध्ये कार्यालयाला टाळे लावण्याची घटना घडली होती. अपमानास्पद वागणूक देणे, या कारणावरून महिलांचे उपोषण झले होते. दरम्यान, या संदर्भात सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.