भ्रष्टाचाराविरोधात राज्यपालांकडे तक्रार; ग्रामपंचायत फंडातून मनमानी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:34 AM2018-09-05T05:34:14+5:302018-09-05T05:34:22+5:30
तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे.
अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे. ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
अलिबागपासून काही किलोमीटर अंतरावर रामराज ग्रामपंचायत आहेत. या गावात विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत बोलून दाखवली आहे. १५ आॅगस्ट २०१८ रोजी तहकूब झालेली ग्रामसभा २८ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी ११ वाजता बोलण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले नाही. ग्रामस्थांनी १४ व्या वित्त आयोगाबाबत माहिती मागितली असता सरपंच आणि ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास नकार दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागील तीन वर्षांतील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करतात. याबाबत विचारणा करण्यात आली असता, खर्चाचा ताळमेळ सांगण्यासही दुर्लक्ष करण्यात येते.
ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असणाºया वस्तूंची खरेदीही सरपंच आणि ग्रामसेवक स्वत:च्या मर्जीने करतात. त्यामुळे विकासकामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत गोळा करण्यात येणारा कर अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न त्याबाबतचा जमाखर्च ग्रामसभेत दाखवण्यातही ग्रामसेवक असमर्थ ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर काही घरकूल उभारण्यातच आली नसल्याचे सभेत उघड करण्यात आले.
गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
- रामराज ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची सीबीआय, सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थ संदेश पालकर यांनी सांगितले. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आल्याने हा विषय ते ग्रामसभेच्या इतिवृत्तात नमूद करणार नाहीत. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रामराज ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. रीतसर कामे करण्यात येत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊनच कामे केली जात आहेत.
- अर्चना पालकर, सरपंच, रामराज ग्रामपंचायत