नेरळच्या शाळांमध्ये तक्रारपेटी कक्ष उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:43 AM2019-07-31T01:43:50+5:302019-07-31T01:44:04+5:30
अविनाश पाटील : नेरळ कन्याशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद
नेरळ : विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बदलापूर-कुळगाव परिसरातील शाळांमध्ये आम्ही तक्रारपेटी कक्ष उभारला असून, त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. अशाच प्रकारे नेरळ परिसरातील शाळांमध्येही तक्रारपेटी कक्ष उभारण्यात येणार आहे. मुलांच्या, मुलींच्या काही अडचणी असल्यास, कोण व्यक्ती त्रास देत असल्यास एक चिट्ठी लिहून तक्रार पेटीत टाकावी. प्रत्येक आठवड्यात एक कर्मचारी येऊन तुमच्या काही अडचणी समजावून घेईल, तसेच शिक्षकांच्याही अडचणी असतील तर त्याच्या पोलिसांना सांगा त्या अडचण दूर करण्यात येतील असा विश्वास नेरळ पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी नेरळ कन्याशाळेत व्यक्त केला आहे.
नेरळ कन्याशाळेत वंजारी समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ आणि वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. शाळेतील विद्यार्थी हे भीतीपोटी तक्रार करत नाहीत, त्यामुळे अशी कोणाची तक्रार असल्यास एक चिठ्ठी लिहून तक्रारपेटीत टाकावी. हा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येईल, तसेच पोलीस प्रशासनालाही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी अविनाश पाटील यांनी केले.