पनवेल : कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत खासगी वने असलेल्या जमिनीवरील वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाचे अधिकारी जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी यांनी थेट वनमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी लक्ष घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कामावर असलेल्या आदिवासी समाजाच्या बांधवावर गुन्हा दाखल करून मूळ मालकाला संरक्षण दिले आहे. या घटनेची तक्रार जिल्हा उपवनसंरक्षकाकडे करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या सुरक्षारक्षकावर केलेला गुन्हा मागे घेऊन संबंधित जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील तारा गावाशेजारी असलेल्या जागेतील वृक्षतोड करण्यात आली आहे. संबंधित वनअधिकारी वनपाल यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर, त्यांनी या जागेत अवघ्या महिन्याभरापूर्वी मोलमजुरीसाठी रोजंदारीवर काम करणाºया खैराटवाडी आदिवासी वाडीतील बाळाराम पवार ह्या मजुरावर गुन्हा दाखल केला. मात्र, हा प्रकार मूळ मालकाला वाचविण्याचा असून, संबंधित जागेचे मालक व मशीन लावून वृक्षतोड करणाºया ठेकेदारावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होणे अपेक्षित असताना, अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे संतोष ठाकूर यांचे म्हणणे आहे.
पनवेलचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांना २२ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून केलेल्या कारवाईचे दस्तावेज महितीसाठी देण्यात येण्याची मागणी केली, परंतु आजतगायत काय कारवाई झाली, त्याची माहिती मिळालेली नसल्याची तक्रार त्यांनी केली. या प्रकरणाची उपवनसंरक्षक कार्यालयाकडून चौकशी करून जमीनमालक व वृक्षतोड करणाºया ठेकेदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी वनविभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली आहे.केंद्र सरकारची पूर्वपरवानगी गरजेची
- केंद्र शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वनेतर कामास बंदी आहे, महाराष्ट्र खासगी वने अधिनियम अंतर्गत कलम २२ अ अंतर्गत खासगी वने हा कायदा लागू असताना, स्थानिक वनविभाग कर्मचाऱ्यांच्या व जमीन मालकाच्या संगनमताने सुमारे तीस वर्षे जुनी सागवान, करंज, गुलमोहर, जांभूळ, आंबा यांसारख्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
- वृक्षतोडीची वन विभागाकडून कागदोपत्री कोणतीही परवानगी घेतलेली नसताना, संबंधित जमीनमालक व वृक्षतोड करणाºया कंत्राटदारावर आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रारीत म्हटले आहे.