वाढीव वीजबिलांच्या ढीगभर तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:21 AM2020-06-25T01:21:09+5:302020-06-25T01:21:13+5:30
बिले पाहून अनेक ग्राहकांना वीजबिलांचा धक्काच बसला आहे. अव्वाच्या सव्वा बिले आल्याने ग्राहक चिंतेत आहेत.
दासगाव : मार्च महिन्यात संचारबंदी लागू झाली आणि सर्वच व्यवहार ठप्प झाले. यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रीडिंग घेणे अशक्य झाले, तर ग्राहकांनाही वीजबिले भरणे शक्य झाले नाही. सद्यस्थितीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने अनेकांना वीजबिले मिळाली. मात्र, बिले पाहून अनेक ग्राहकांना वीजबिलांचा धक्काच बसला आहे. अव्वाच्या सव्वा बिले आल्याने ग्राहक चिंतेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वीजबिले भरण्यास बाहेर पडणे कोणालाच शक्य नव्हते. त्यातच महावितरण विभागानेही मीटर रीडिंगचे काम बंद ठेवले होते. यामुळे मार्च महिन्यापासून सरासरी बिले काढून ग्राहकांना पाठविण्यात आली. ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन लागू केल्याने, घरात वीज वापर प्रतिदिन वापरापेक्षा अधिक झाला. फ्रीज, ए.सी., पंखे याशिवाय टीव्ही संच दिवसभर सुरू राहिल्याने वीजबिले वाढल्याची शक्यता महावितरण विभागाने व्यक्त केली आहे, तर दुकाने, लघू व्यावसायिक, कारखानदार यांचा वीज वापर कमी प्रमाणात झाला असला, तरी वीजबिले मात्र अधिक आल्याने व्यावसायिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. घरगुती ग्राहकांना मात्र वीजबिले अधिक आल्याने महाड उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्राहकांनी गर्दी केली. हजाराच्या पटीत ही वीजबिले आल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. ऐन लॉकडाऊन काळात अनेकांचे लघू व्यवसाय, नोकºया गेल्याने हातात पैसा उरलेला नसतानाच आलेल्या वीजबिलांनी संतापले आहेत. या बिलांचा भरणा कसा करायचा, असा यक्ष प्रश्न ग्राहकांसमोर आहे.
लॉकडाऊन काळात वीजबिले आॅनलाइन भरणा करण्यासंदर्भात शासनाने प्राधान्य दिले होते. यामुळे अनेकांनी महावितरण अॅपऐवजी अन्य खासगी अॅपद्वारे वीजबिल भरणा केलेला आहे. मात्र, वीजबिले भरूनही आलेल्या बिलांमध्ये भरलेल्या रकमेचा पुन्हा समावेश झाला असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. अनेकांना यापूर्वी कमी वीजबिल येत होते. मात्र, आता आलेले वीजबिल हे हजाराच्या संख्येत आले आहे. यामुळे ग्राहकांनी महावितरण कार्यालयासमोर वीजबिले कमी करून मिळावी, याकरिता गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही गर्दी होत असून, महावितरणचा एक कर्मचारी या सर्वांना तोंड देत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे.
>ग्राहकांना पावसात उभे राहावे लागतेय
महावितरणच्या नियमानुसार ३०० आणि ५०० युनिटच्या वर एक जरी युनिट पडला, तरी वीज आकार वाढत आहे. सलग तीन महिने वीजबिल भरणा न झालेल्या ग्राहकांना यामुळे वाढीव बिलांचा फटका बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या ग्राहकांना कार्यालयात प्रवेश दिला जात नसल्याने, कार्यालयाच्या खिडकीतून कर्मचारी या समस्या जाणून घेत असला, तरी बाहेर पावसात या ग्राहकांना उभे राहावे लागत आहे. शिवाय ज्या ठिकाणी हे ग्राहक उभे राहत आहेत, त्या ठिकाणी पाणी साचले असल्याने याबाबतही ग्राहकांनी आपला संताप व्यक्त केला.