जिल्ह्यातील ४० टक्के भात लावण्या पूर्ण
By admin | Published: July 4, 2017 06:59 AM2017-07-04T06:59:19+5:302017-07-04T06:59:19+5:30
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून ओसरल्याने, लावण्यांकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ३५ हजार
विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून ओसरल्याने, लावण्यांकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे एकू ण भात लावणी क्षेत्राच्या ४० टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रावर भात लावण्या जोरात सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या प्रस्तावित आहेत; परंतु प्रत्यक्षात १ लाख १० हजार हेक्टरावर भात लावण्या होतील, अशी अपेक्षा असल्याचे तरकसे यांनी सांगितले. जिल्ह्यात गतवर्षी ३ जुलै २०१६पर्यंत सरासरी पर्जन्यमान ९९३ मि.मी. झाले होते. ते यंदा याच कालावधीत म्हणजे ३ जुलै २०१७पर्यंत १००१.२८ झाले आहे. यंदाचे सरासरी पर्जन्यमान गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाले असून, ते भात पिकाकरिता चांगले असल्याची माहिती कृतिशील शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली. यंदा पाऊस वेळेत दाखल झाल्याने आणि भात पिकासाठी पोषण हवामान असल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ११३.५० मि.मी. पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे. अलिबाग १७, पेण ४३.२०, मुरुड ०९, पनवेल ३६.४०, उरण २२, कर्जत ६५, खालापूर ५७, रोहा ४२, पाली-सुधागड ५१, तळा ४७, महाड ४५, पोलादपूर ५५, म्हसळा १७, तर श्रीवर्धन येथे २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मजूर मिळत नसल्याने अडचण
पाली : पावसाला सुरुवात झाल्यापासून कधी पाऊस, तर कधी ऊन अशी अवस्था होती; परंतु नंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बैलाच्या साहाय्याने नांगर घेऊन, तर कोणी आधुनिकयंत्रे घेऊन लावणी करण्यास सुरुवात केली आहे; परंतु या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. सकाळी उठल्यानंतर लावणीची कामे पूर्ण कशी होणार? ही चिंता घेऊन आदिवासीवाडी व गावागावांत जाऊन मजूर शोधण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे. तर ज्याच्याकडे बैलजोडी नाही, ते दुसऱ्याच्या आधाराखाली आपल्या लावणीसाठी प्रतीक्षा करत आहेत. मग शेतकरी आपल्या कुटुंबातील व नात्यातील मंडळींना घेऊन भात लावणीच्या कामास सुरुवात करत आहेत.
मुरु डमध्ये लावणीला सुरु वात
आगरदांडा : मुरु ड तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रात भातपिकासाठी लागवड केली जाते. त्यापैकी ९० टक्के भातपिकाची लागवड करण्यात आली. यंदा पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीला सुरुवात केली होती.
लवकर पेरणी केल्याने लावणीयुक्त रोपे लवकर तयार झाली. मुरु ड पंचक्र ोशीतील शेतकरी विविध प्रकारच्या भातांची लागवड करत आहेत. चांगल्या पावसामुळे शेतातील सर्व भागात पाणीच पाणी साचले आहे. पावसाचा जोर आता कमी होताच, शेतकरी लावणीच्या कामात गर्क झालेला पाहावयास मिळत आहे.