जलयुक्त शिवार योजनेची कामे तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 03:53 AM2018-04-08T03:53:26+5:302018-04-08T03:53:26+5:30
जलयुक्त शिवार योजनेची कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश महाड आमदार भरत गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बिरवाडी : जलयुक्त शिवार योजनेची कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश महाड आमदार भरत गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या कार्यालयात महाड पोलादपूरमधील महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा घेण्याकरिता शनिवारी दुपारी बैठक बोलविण्यात आली होती.
बैठकीप्रसंगी महाड पंचायत समितीचे सभापती सीताराम कदम, पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, राजिपचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, महाड-पोलादपूरमधील तहसीलदार, कृषी तालुका अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभाग अधिकारी, लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी उपस्थित होते.
गोगावले यांनी, महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा अधिकारी वर्गाकडून जाणून घेत, ज्या गावांमध्ये या योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत, ती तातडीने पूर्ण करावी, असे आदेश दिले. पाणीटंचाई निवारण कामांमध्ये हयगय करणाºया अधिकाºयांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी बैठकीमध्ये योजनेचे सचिव तालुका कृषी अधिकारी असल्याने संबंधित खात्याच्या सर्व अधिकाºयांनी कामाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महाड-पोलादपूरमधील पाणीटंचाई निवारण कामकाजाबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. पोलादपूरमधील १३ गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेमध्ये करण्यात आला आहे. तर महाड तालुक्यातील १८ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये टँकरग्रस्त गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. शासनाच्या जाचक अटी-शर्तींमुळे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी अधिकाºयांनी घ्यावी, अशा सूचना गोगावले यांनी दिल्या. नदीवरील सिमेंट बंधारे, विहिरी, तलाव यांच्या माध्यमातून पाणीटंचाई निवारण करण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.