पेण हरित रेल्वे स्थानकाची संकल्पना पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:47 PM2019-05-22T23:47:48+5:302019-05-22T23:47:53+5:30
पर्यावरणपूरक स्थानक म्हणून नावारूपास : सुविधांमध्ये सौरऊर्जा पॅनल, पवनचक्की याद्वारे वीजनिर्मिती
पेण : कोकणातील रेल्वे स्थानकात इकोफ्रेंडली सुशोभीकरणावर भर देण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. त्यानुसार पर्यावरणाशी समतोल साधर्म्य राखणारे निसर्गसौंदर्य त्याचबरोबर इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून पेण रेल्वे स्थानक भविष्यात सुरेख असे पर्यावरणपूरक स्थानक म्हणून नावारूपास येत आहे.
पेण रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती स्थानक म्हणून उभे राहिले आहे. सध्या या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झालेले आहे. यामध्ये पेण ते पनवेल या दुहेरी मार्गाची लांबी ३५.४६ किमी आहे. तर पेण-रोहा दुहेरी मार्ग ४० किमी लांब आहे. या मार्गावर पेण ते पनवेल असा दुहेरी मार्ग पूर्णपणे तयार झाला असून पेण-रोहा मार्गावरील पेण ते नागोठणे दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून नागोठणे ते रोहा दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रेल्वे मार्गावर तासी १०५ किमी प्रतिवेगाने रेल्वे गाड्या धावत आहेत. या मार्गावरील पुलांची क्षमता २५ मेट्रिक टन एवढी आहे. पेण-पनवेल मार्गाचा प्रस्तावित खर्च २६०.९६ कोटी झालेला आहे. तर पेण- रोहा रेल्वे मार्गाचा खर्च ३०० कोटी पर्यंत आहे. २००६ साली या कामांना सुरुवात झाली होती. मार्च २०१५ मध्ये हे काम बहुतांश पूर्ण झालेले आहे.
या रेल्वे मार्गावर इलेक्ट्रॉनिक, इंटरलॉकिंग प्रणालीयुक्त सुविधा सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे. यामुळे आता या मार्गावरील पेण रेल्वे स्थानकाला भविष्यात गर्दीचे मोठे स्वरूप येणार आहे. पेण स्थानकात पर्यावरणपूक सुविधांमध्ये सौरऊर्जा पॅनल व पवनचक्की याद्वारे वीज निर्माण करून त्यावर आधारित एलईडी लाइट्स, फॅन, वॉटर कुलर, यूटीएस, ग्लोसिंग बोर्ड्स, पोल लाइट्स अशा प्रकारे अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून पेण रेल्वे स्थानकाला झळाळी मिळालेली आहे. ही सर्व यंत्रणा सध्या स्थानकामध्ये उपलब्ध असून स्थानकाचे देखणे रूप भविष्यात अधिक कलात्मक करण्याकडे रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्यानुसार येत्या काळात पेण रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात मोठी भर पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
प्रवाशांना लागणाऱ्या सर्व सुविधा स्थानकामध्ये उपलब्ध असून फक्त पार्र्किं ग व्यवस्थेमध्ये जागेची कमतरता भासत आहे. सध्या रेल्वे स्थानक परिसरात उपलब्ध असणारे वाहनतळ हे फक्त दुचाकी वाहनांपुरतेच सीमित आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात, अशी रेल्वे प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.
पेणमधील या हरित रेल्वे स्थानकामुळे भविष्यात येथील लोकसंख्या वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.