महिनाभरात सेफ्टी आॅडिट पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:40 AM2018-02-21T01:40:47+5:302018-02-21T01:40:53+5:30
रोहा औद्योगिक वसाहतीत असणाºया सर्व म्हणजे ४४ उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी आॅडिट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे सक्त आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण
अलिबाग : रोहा औद्योगिक वसाहतीत असणाºया सर्व म्हणजे ४४ उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी आॅडिट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे सक्त आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी रोहा येथे दिले.
रोहा येथील अँथिया डीआरटी एरोमॅटिक प्रा. लि. कंपनीला सोमवारी लागलेली भीषण आग आणि त्यानंतर झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चव्हाण यांनी मंगळवारी सकाळी रोहा येथील विश्रामगृहावर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक बोलावली होती. पालकमंत्री चव्हाण सोमवारी रात्रीच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आजूबाजूच्या गावात वायुप्रदूषणामुळे समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मदत व बचाव कार्याचे नियमन केले. मंगळवारी सकाळी त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सोमवारच्या घटनेनंतर परिसरातील गावकºयांपर्यंत सुरक्षा संदेश वेळीच पोहोचवून त्याबाबत उपाययोजना करण्यात आलेली दिरंगाई व अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
आगीच्या या घटनेचे सत्यशोधन करण्यासाठी महसूल, औद्योगिक सुरक्षा, अग्निशमन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभागाच्या अधिकाºयांचे संयुक्त पथक या घटनास्थळाची येत्या २४ तासांत तपासणी करून सत्यशोधन अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करेल. ही तपासणी पूर्ण होईपर्यंत घटनास्थळ सिल केले जाईल. कंपनी व्यवस्थापनाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे निर्देश या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी दिले.
रोहा औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक उद्योग घटकाने स्वतंत्र सुरक्षा अधिकारी नेमावा, प्रत्येक कंपनी समोर फायर हायड्रन्ट बसविण्यात येऊन ते कार्यान्वित करावे, त्याची नियमित चाचणी घेऊन त्याची सर्व जबाबदारी संबंधित कंपनी व्यवस्थापनास द्यावी, रोहा आणि परिसरातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या निकषांचे पालन होते आहे किंवा नाही, याची नियमित तपासणी होण्यासाठी सहा प्रदूषण नियंत्रण निरीक्षक नेमण्याबाबत महिनाभरात कारवाई करून रोहा येथील बंद झालेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय पुन्हा कार्यान्वित करावे, नेमलेल्या निरीक्षकांचे वेतन रोहा औद्योगिक संघटनेच्या निधीतून अदा करावे, असे आदेश दिले आहेत.
या बैठकीस जि.प.अध्यक्ष अदिती तटकरे, आ. अवधूत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सह संचालक एस.पी. राठोड, उपसंचालक विक्र म काटमवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बी. आर. वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, स्थानिक प्रांताधिकारी, तहसीलदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.