रोह्यातील सर्व उद्योगांचे महिनाभरात सेफ्टी ऑडिट पूर्ण करा, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 05:46 PM2018-02-20T17:46:45+5:302018-02-20T17:47:19+5:30

रोहा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे 44 उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी ऑडीट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज रोहा येथे दिले.

Complete safety audits for all enterprises within a month, order of Guardian Minister Ravindra Chavan | रोह्यातील सर्व उद्योगांचे महिनाभरात सेफ्टी ऑडिट पूर्ण करा, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश

रोह्यातील सर्व उद्योगांचे महिनाभरात सेफ्टी ऑडिट पूर्ण करा, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश

Next

- जयंत धुळप

रायगड - रोहा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे 44 उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी ऑडीट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज रोहा येथे दिले.

            रोहा येथील अँथिया डीआरटी ॲरोमॅटिक प्रा. लि. कंपनीला लागलेली भीषण आग आणि त्यानंतर झालेल्या आपद्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री चव्हाण यांनी आज सकाळी रोहा येथील विश्रामगृहावर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. अवधूत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई येथील एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले, औद्योगिक सुरक्षा  व आरोग्य संचालनालयाचे सह संचालक एस.पी ऱाठोड, उपसंचालक  विक्रम काटमवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वाघमारे, भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी तसेच स्थानिक प्रांताधिकारी, तहसिलदार आदी अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

दरम्यान पालकमंत्री घटनास्थळी रात्रीच दाखल झाले होते. त्यांनी  आजूबाजूच्या गावात वायुप्रदूषणामुळे समस्या निर्माण होऊ नये यासाठी मदत व बचाव कार्याचे नियमन केले. आज सकाळी त्यांनी  घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी त्यांचे समवेत उपस्थित होते.

 यावेळी झालेल्या घटनेची कारणमिमांसा करण्यात आली. तसेच कालच्या घटनेनंतर परिसरातील गावकऱ्यांपर्यंत सुरक्षा संदेश वेळीच पोहोचवून त्याबाबत उपाययोजना करण्यात झालेली दिरंगाई व अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की, या घटनेचे सत्यशोधन करण्यासाठी महसूल, औद्योगिक सुरक्षा, प्रविभाग, अग्निशमन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक या घटनास्थळाची येत्या 24 तासात तपासणी करुन सत्यशोधन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करेल. हि तपासणी पूर्ण होईपर्यंत  घटनास्थळ सिल केले जाईल. कंपनी व्यवस्थापनाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच रोहा औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक उद्योग घटकाने स्वतंत्र सुरक्षा अधिकारी नेमावा, प्रत्येक कंपनी समोर फायर हायड्रन्ट बसविण्यात येऊन ते कार्यान्वित करावे, त्याची नियमित चाचणी घेऊन त्याची सर्व जबाबदारी संबंधित कंपनी व्यवस्थापनास द्यावी, रोहा आणि परिसरातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांकडून प्रदूषण नियंत्रणाचे निकषांचे पालन होते आहे किंवा नाही याची नियमित तपासणी होण्यासाठी सहा प्रदुषण नियंत्रण निरीक्षक नेमण्याबाबत महिनाभरात कारवाई करुन रोहा येथील बंद झालेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय पुन्हा कार्यान्वित करावे, नेमलेल्या निरीक्षकांचे वेतन रोहा औद्योगिक संघटनेच्या निधीतून अदा करावे, रोहा येथील उद्योग  घटकांचे सांडपाणी कुंडलिका नदीच्या निर्धारित क्षेत्रात व प्रक्रिया करुन सोडण्यात येते किंवा नाही याची तपासणी दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल व तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जाईल, रोहा औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनस जागेस मान्यता घेणे, स्थानिक रहिवाशांना आपत्तीच्या प्रसंगी सुचना मिळावी यासाठी सायरन कार्यान्वित करणे आदी उपाययोजना करण्यास संबंधित यंत्रणांना सांगण्यात आले.  या सर्व निर्देशांची अंमलबजावणी ही येत्या महिनाभरात करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, असेही ना. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी झालेल्या चर्चेत जि.प. अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ.अवधूत तटकरे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी सहभाग घेऊन आपली मते मांडली. या घटनेनंतर पालकमंत्री लगेच आले आणि त्यांनी मदत व बचाव कार्य केले तसेच उपाययोजनांबाबत यंत्रणांचे कार्यान्वयन केले याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
 

Web Title: Complete safety audits for all enterprises within a month, order of Guardian Minister Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.