जिल्ह्यातील २५ हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:48 AM2019-06-13T01:48:18+5:302019-06-13T01:48:28+5:30
बळीराजा सुखावला : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना आला वेग
अलिबाग : गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ जूननंतर बरसणारा आधीच बरसल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एक लाख चार हजार भाताचे क्षेत्र आहे. त्यातील १० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते. त्यानुसार २५ हेक्टर क्षेत्रावर भाताच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पावसाने दिलासादायक सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाने हजेरी लावल्याने त्यांनीही तातडीने भात पेरणीच्या कामांना सुरुवात केल्याने शेतावर शेतकरी आणि शेतमजूर यांची एकच लगबग सुरू असल्याचे दिसून येते. एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी आधीच उरकून घेतल्याने पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने औद्योगिकीकरण झाल्याने तसेच नव्याने होत असलेल्या विकासकामांमुळे शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. त्याचप्रमाणे शेती करताना लागणारे बियाणे, शेतीची अवजारे, शेतमजुरांच्या मजुरीचे वाढते दर शेती करणाºया शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाने पाठ फिरवली अथवा मोठे वादळ झाले तर शेतीचे आणि पर्यायाने शेतकºयांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होेते. त्यामुळे शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. शेत विम्याच्या अटींमुळे शेतकरी विमा काढायलाही तयार होत नसल्याने त्याचाही फायदा त्यांना घेता येत नाही. असे असताना सुद्धा रायगडातील शेतकरी जिद्दीने शेती करतात.सध्या शेतांमध्ये भात पिकाची पेरणी करण्याच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र आहे.
१० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक
१जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार हेक्टर भात पिकाचे क्षेत्र आहे. त्यातील फक्त १० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते.
२गेल्या वर्षी ४० क्विंटल भाताचे उत्पादन घेण्यात आले होते. यावेळीही समाधानकारक पाऊस झाल्यास भाताचे उत्पादन समाधानकारक होईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला.
सेंद्रिय खताचा वापर
च्सध्या शेतामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्यास ते हानिकारक असते. यावर उपाय म्हणून सेंद्रिय खतांवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे येथील शेतकरी भाताची विक्री करत नाहीत. स्वत:साठी ते भाताचा वापर करतात. त्यामुळे त्यांना बाजारातून तो विकत घ्यावा लागत नाही. आमच्या शेतामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर कसा करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाते, असे येथील महिला शेतकरी नीता सोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.