महाड एमआयडीसीतील बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:43 AM2020-01-02T00:43:03+5:302020-01-02T00:43:07+5:30

जॅकवेलचे काम मात्र अपूर्ण; अतिवृष्टी, लांबलेल्या पावसामुळे कामास विलंब

Completion of the dam in Mahad MIDC | महाड एमआयडीसीतील बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

महाड एमआयडीसीतील बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

googlenewsNext

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्रात सावित्री संगम परिसरात कांबळे तर्फे महाड गावाच्या हद्दीत बंधारा बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बंधाºयाचे काम पूर्णत्वास आले असून, अद्याप जॅकवेलचे काम मात्र अपूर्ण आहे. यामुळे सध्या तरी जुन्या जॅकवेलवरून पाणी उचले जात असल्याने दूषित पाण्याची समस्या मात्र कायम राहिली आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे.

महाड एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्राला पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आहे. सावित्री संगम परिसरात जॅकवेल आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे. मात्र, ज्या ठिकाणी हे पाणी उचलले जाते, त्या ठिकाणी टेमघर नाल्यातील दूषित पाणी मिसळले जाते. यामुळे अनेक वेळा औद्योगिक परिसरातील नागरिकांना रंगीत पाणीपुरवठा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे हे जॅकवेल अन्य ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात आली. सावित्री संगम परिसरात कांबळे तर्फे महाड या गावाच्या हद्दीत नवीन बंधाºयाला सन २०१७ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानुसार हे काम व्हीयूबी कन्स्ट्रक्श्न कंपनीला देण्यात आले. यामध्ये बंधारा, नवीन पाइपलाइन, जॅकवेल, पॅनलरूम, रस्ता, या सुविधांचा समावेश आहे.

सन २०१७ मध्ये या कामाला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सावित्री नदीवर हा बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामाकरिता ११ कोटी ४३ लाख ६० हजार ११० इतकी रक्कम मंजूर झाली आहे. त्यानुसार जवळपास ९० टक्के रक्कम संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आली आहे. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी जून २०१९ देण्यात आला होता. मात्र, कालावधी उलटून गेल्यानंतर संबंधित ठेकदार कंपनीला कालावधी वाढवून देण्यात आला आहे. सध्या बंधाºयाचे काम पूर्ण झाले असले तरी जॅकवेल, रस्ता, पॅनलरूम ही कामे अपूर्ण आहेत. ही कामे पावसाळ्यानंतर प्रगतिपथावर असल्याचे महाड औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अजून दोन ते तीन महिने हे काम पूर्ण होण्यास लागणार असल्याने सध्या तरी जुन्याच जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जात असल्याने दूषित पाण्याची समस्या कायम राहिली आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर दूषित पाण्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

नागरिकांचा त्रास होणार कमी
महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर गावापासून वाहत येणारा नाला हा सावित्री नदीला येऊन मिळतो. या ठिकाणी सावित्री नदीत असलेल्या जॅकवेलमधून पाणी उचलले जाते आणि शेजारील औद्योगिक क्षेत्रात पुरवठा केला जातो. पाणी दूषित असल्याच्या तक्रारी अनेक वेळा नागरिकांनी केल्यानंतर या नवीन योजनेला मंजुरी मिळाली होती. यामुळे टेमघर नाल्याचे पाणी ज्या ठिकाणी नदीला मिळते, त्या ठिकाणी होणारे पाण्याचे प्रदूषण आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. सध्या ज्या ठिकाणी जॅकवेल बांधण्यात येत आहे, तेथे बंधारा बांधल्याने दूषित पाणी जॅकवेलपर्यंत येणे शक्य होणार नाही. हे काम लांबलेला पाऊस यामुळे संथगतीने सुरू होते, असे एमआयडीसीच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

हे काम लांबलेला पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे रखडले आहे. मात्र, उर्वरित काम लवकरच मार्गी लागून नागरिकांना या नव्या योजनेतून पाणीपुरवठा केला जाईल.
- एस. एस. गीते,
उप अभियंता, एमआयडीसी, महाड

Web Title: Completion of the dam in Mahad MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.