अलिबाग : पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. सामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आली असतानाही मोदी सरकार गप्प बसले आहे. जनतेच्या मनातील खदखदणारा आक्रोश बाहेर काढण्यासाठी सोमवारी काँग्रेसने भारत बंदची हाक दिली होती. रायगड जिल्ह्यामध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेसने पुकारलेल्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तसेच समाजवादी पक्षाने आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला.आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घटत असताना मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ करत आहे. जनतेची आर्थिक घडी विस्कटत असल्याने सरकारविरोधात चांगलीच नाराजी पसरली आहे. पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहे. त्यामुळे खिशाला चाट बसत असतानाच गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र मोदी सरकार जनतेच्या जिव्हाळ््याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. याविरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती.रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसने पुकारलेल्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष यांच्यासह अन्य सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला.अलिबाग शहरातील शिवाजी पुतळा परिसरातून काँग्रेसने आंदोलनाला सुरुवात केली. शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा गेला. घोडागाडी, सायकलवरून आंदोलकांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर हिराकोट तलाव परिसरातील जिल्हा कारागृहाजवळ आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यानंतर तेथेच सभा घेण्यात आली. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. विविध पक्षांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बाजारपेठांमधील दुकाने काही अंशी बंद ठेवण्यात आली होती. गणेशोत्सवाचा कालावधी सुरू होत असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडणार हे गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे दुकान बंद करा अशी कोणावरच जबरदस्ती केली नसल्याचे अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी सहकार्य केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी काँग्रेसचे अॅड. प्रवीण ठाकूर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड. श्रद्धा ठाकूर, माजी तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषिकांत भगत, समाजवादी पक्षाचे अशरफ घट्टे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.>महाडमध्ये शंभर टक्के बंद !महाड : वाढती महागाई आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेला भारत बंद महाडमध्ये शंभर टक्के यशस्वी झाला. यावेळी शहरातून काढलेल्या निषेध मोर्चात मोदी आणि फडणवीस सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोर्पे, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष निकम, हनुमंत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत म्हामुणकर, धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष सुषम यादव, माजी नगराध्यक्ष सूर्यकांत शिलीमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत जाधव,नीलेश महाडिक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, मनसेचे शहराध्यक्ष बंटी पाटील आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस कार्यालयापासून निघालेला मोर्चा शिवाजी चौक, चवदार तळे, बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चेकरी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन सादर केले. बंदमुळे शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवण्यात आली होती, तर ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झाले होते.>अत्यावश्यक सेवा सुरू; व्यापाºयांचा बंदला पाठिंबारसायनी : पेट्रोल, डिझेल, एल.पी.जी. गॅसच्या सतत वाढणाºया किमतीने महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे व गृृृृहिणींचे बजेट कोलमडले आहे. म्हणून सोमवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारत बंदची हाक दिली होती. रसायनी परिसरातही काँग्रेस आय, म.न.से.,राष्ट्रवादी काँग्रेस, शे.का.प.यांनी बंदला पाठिंबा दिला. तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष नाना म्हात्रे, कार्याध्यक्ष व माजी सरपंच कृष्णा पारंगे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब म्हसकर, माजी सरपंच संदीप मुंढे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी या सर्वांनी मोहोपाडा शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून महागाईबद्दल भाषणे केली. बंदमधून अत्यावश्यक सेवा व शाळा-कॉलेज, स्कूल बसेसना वगळले होते. इंधनाच्या वाढणाºया दरामुळे काही स्कूल बसेस बंदमध्ये सहभागी झाल्याने रसायनीतील पिल्लई इंटरनॅशनल कॉलेज आणि प्रिआ स्कूलला सुटी होती. मराठी माध्यमातील घटक चाचणी परीक्षा सुरू असल्याने या शाळा सुरू होत्या. बसेस, रिक्षा वाहतूक सुरू होती.
जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 2:23 AM