अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी विनाशकारी प्रकल्प असा शिक्का मारून या प्रकल्पाला हद्दपार केले. आता तोच प्रकल्प रायगड जिल्ह्यात विसावण्याच्या तयारीत असल्याने रायगडमधील राजकीय नेते आणि नागरिकांच्या या प्रकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार असे बोलले जात असेल, तरी या ४० गावातील जमीन तेलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरणार नाही शिवाय प्रकल्पाला सलग जमिनीची आवश्यकता असल्याने या जमिनीचा वापर नेमक्या कोणत्या उद्देशासाठी करण्यात येणार हे गुलदस्त्यातच आहे.नाणारमधील प्रकल्पाला रत्नागिरी जिल्ह्यातून विरोध झाल्याने नक्कीच हा घातक प्रकल्प असणार त्यामुळे हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात उभारू नये. प्रकल्पासाठी जमीन देणार नाही असा पवित्रा म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी घेतला.विकास प्रकल्पांना जिल्ह्यात कायम विरोधच झाला आहे. गावात रोजगार नाही म्हणून रोजगाराच्या शोधात नागरिक मुंबईसह अन्य ठिकाणी जातात. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. रोहा तालुक्यातही अनेक धोकादायक रासायनिक प्रकल्प आहेत. त्यामुळे कोणाचेच नुकसान झालेले नसल्याने रोजगाराच्या संधी देणाऱ्या प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे असे मत रोहा तालुक्याचे माजी शिक्षण सभापती नितीन परब यांनी व्यक्त केले. विकासाला चालना मिळत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असेल तर प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सार्थक जाधव यांनी स्पष्ट केले.प्रकल्प रोहा व मुरु ड तालुक्यात येणार असल्याचे बोलले जाते. स्थानिकांना रोजगारामध्ये ८० टक्के प्राधान्य दिल्यास या प्रकल्पाविषयी सहमती असेल असे मुरुड तालुक्याचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील शेकापने प्रकल्पासाठी नव्याने भूसंपादन करण्यास विरोध केला आहे. मात्र, सरकारकडे उपलब्ध असणाºया जमिनीवर तो उभारण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. अलिबागमधील शिवसेनेने अद्यापही या प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बैठक पार पडणार असून शिवसेनेचे पदाधिकारी या बैठकीला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाणार प्रकल्पाबाबत संमिश्र आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:50 AM