गणेशोत्सवातील निर्माल्यापासून बनवणार कंपोस्ट खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:28 AM2018-09-19T04:28:58+5:302018-09-19T04:29:21+5:30
सिडकोने केली विसर्जन घाटावर व्यवस्था; तयार खत उद्यान, तसेच परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी वापरणार
कळंबोली : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवातील निर्माल्य स्वतंत्र जमा करण्याची व्यवस्था कळंबोली आणि कामोठे येथील विसर्जन तलावावर करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन टन निर्माल्य जमा केले असल्याची माहिती सिडकोच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यातून तयार झालेल्या खताचा वापर उद्यान त्याचबरोबर झाडांकरिता करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कळंबोली, कामोठे वसाहतीत दरवर्षी साडेसात हजार घरगुती व सार्वजनिक गणपती बसविले जातात, त्यामध्ये कामोठे येथे ४१५७ व कळंबोलीत ३३८० इतक्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या परिसरात दीड दिवसांच्या घरगुती गणपतीची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्याशिवाय गौरी-गणपतीचा आकडाही मोठा आहे. मूर्तींबरोबर निर्माल्यही जलाशयात विसर्जित करण्यात येत असे. त्यामुळे पाणी दूषित होऊन जलचरांवर परिणाम होत होता. या कारणाने निर्माल्य पाण्यात टाकू नये, असे आवाहन विविध पर्यावरण, त्याचबरोबर सामाजिक संस्थाकडून करण्यात येऊ लागले.
दोन वर्षांपूर्वी पनवेल शहरात कृत्रिम तलाव करून यावर चांगला तोडगा काढला होता. तरी सिडकोमध्ये मात्र अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही; परंतु गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रशासनाने निर्माल्याकरिता खास व्यवस्था केली आहे. एकूण पाच निर्माल्य कलश आणि सात व्हॅन, ११ लिटरच्या सहा आणि इतर मोठ्या दहा, अशा एकूण १६ डसबिन विसर्जन तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. अनिरुद्ध अकादमीचे स्वयंसेवकही या कामी सहकार्य करीत आहेत. सिडकोने गेल्या पाच दिवसांत सुमारे तीन टन निर्माल्य संकलन केले आहे. विसर्जन तलावात निर्माल्य टाकण्यास मनाई करण्यात आली आहे.
तीन महिन्यांत खत तयार होणार
११ दिवसांचे गणपती विसर्जनानंतर त्याचे कंपोस्टिंग केले जाणार आहे. सिडकोने कामोठे येथील सेक्टर ५ येथील मोकळ्या भूखंडावर ही व्यवस्था केली आहे. येथे खड्डा तयार करून, त्यात निर्माल्य आणि पुन्हा माती टाकून तीन थर तयार करण्यात येणार आहेत. तीन महिन्यांत कंपोस्ट खताची निर्मिती होईल.
निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती
कर्जत : कर्जत नगरपालिकेने स्वच्छतेबरोबर प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजन सुरू केल्या आहेत. उत्सवकाळात उल्हास नदीमध्ये निर्माल्य टाकू नये, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. या निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे.
कचरा संकलन आणि विघटनामध्ये कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कर्जतचे नाव देशात आघाडीवर नेल्यानंतर आता उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.
कर्जत शहरात ज्या चार ठिकाणी गणेशघाट आहेत, तेथे निर्माल्य कलश ठेवून पालिका थांबली नाही, तर त्यांनी आपले स्वच्छतादूत दहिवली, महावीर पेठ, आमराई, मुद्रे येथील गणेशघाटावर उभे करून भक्तांकडील निर्माल्य गोळा केले जात आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर निर्माल्य कलश
रेवदंडा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत परिसरातील समुद्रकिनाºयावर निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. हा उपक्रम पर्यावरण संवर्धन व जल स्वच्छता अभियान या मुख्य हेतूने राबवला जात आहे.
गणेश विसर्जन सोहळ्यानंतर किनाºयावर प्रदूषण निर्माण होते, तसेच किनारे विद्रूप रूप प्राप्त करतात, हे टाळण्यासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तमंडळींचा त्याला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिष्ठानतर्फे वृक्षलागवड केल्यावर श्री सदस्यांनी निर्माल्य जमा करून खतनिर्मिती करण्याचा उपक्र म राबवला आहे.