हॉटेलात ऑर्डर येईपर्यंत मास्क लावण्याची सक्ती; म्हसळा तहसीलदारांनी दिल्या हॉटेल संघटनेला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:27 PM2021-02-24T23:27:06+5:302021-02-24T23:27:30+5:30
म्हसळा तहसीलदारांनी दिल्या हॉटेल संघटनेला सूचना
म्हसळा : म्हसळा तालुक्यात नव्याने एक कोरोनाबाधित सापडला आहे. बाधित अधिक रुग्ण वाढू नयेत, याची खबरदारी घ्यावी म्हणून म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांनी हॉटेल चालक मालक संघटना, कापड व किराणा व्यापारी असोसिएशनची मिटिंग घेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबाबतीत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार दुकानात व हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना मास्क लावणे अनिवार्य केले आहे. तसेच हॉटेलमध्ये ग्राहकाला खाद्यपदार्थ समोर येइपर्यंत मास्क ठेवणे सक्तीचे आहे. तर, संपूर्ण हॉटेल स्वच्छ ठेवणे, सॅनिटायझर वापर करून पैसे देवाण-घेवाण करणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी बाबतीत तसदी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तशा सूचना हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलमध्ये लावल्या आहेत.
म्हसळा तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीला झुणका-भाकर केंद्रप्रमुख सुभाषशेठ करडे, नगरसेवक बाबाजान पठाण, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, हॉटेल संघटना अध्यक्ष शैलेश कुमार पटेल, सचिव रामदास रिकामे, कापड असोसिएशनचे अध्यक्ष सुरेशशेठ जैन, चंद्रकांत कापरे, दत्ताशेठ लटके, ईनुस मेमन, दुर्जनसिंह राठोड, दिलीप राजपुत, नीलेश गुरव आदी दुकानचालक उपस्थित होते.