बरवाडी : राज्यातील संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांनी ‘आपले सरकार’ सेवाकेंद्रामध्ये नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी बुधवार, १ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. २०११ पासून सुरू असलेले संग्राम योजनेची मुदत डिसेंबर २०१५मध्ये संपलेली असताना मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्या आश्वासनानंतर राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांनी विनामानधन काम सुरू ठेवले होते. शासन निर्णयानुसार ११ आॅगस्ट, २०१६ला संग्राम प्रकल्पाऐवजी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र या प्रकल्पाची घोषणा करून त्यात या संगणक परिचालकांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु शासन निर्णयातील १५ लाख रु पये उत्पन्न निधीच्या अटीमुळे, तसेच पंचायत समिती स्तरावर चुकीच्या पद्धतीने पडलेल्या क्लस्टरमुळे सेवा केंद्रांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील सुमारे २७५ संगणक परिचालकांना घरी बसण्याची वेळ आल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. गेले सहा महिने उलटूनही या परिचालकांना न्याय मिळालेला नाही.‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र करण्याचे मानस असून शासनाच्या हलगर्जीमुळे गेल्या पाच वर्षांपासून संग्राम प्रकल्पात काम करणाऱ्या सर्व संगणक परिचालकांची नियुक्ती नसल्याने ते बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले असून, रायगड जिल्ह्यासह विविध ठिकाणी हे आंदोलन सुरू झाले आहे. संग्राम प्रकल्पात काम केलेले जिल्ह्यातील एकूण एक संगणक परिचालक ‘आपले सरकार’ सेवा केंद्र प्रकल्पामध्ये नियुक्त झाल्याशिवाय जिल्ह्यात एकही ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरू होऊ देणार नाही. गरज भासली तर मंत्रालयावर मोर्चाची तयारी के ली असल्याची प्रतिक्रियाराज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य सचिव मयूर कांबळे यांनी दिली.>रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटना सहभागी आपले रायगड जिल्ह्यात एकूण ८२९ ग्रामपंचायती असून संग्राम प्रकल्पामध्ये सुमारे ६५० संगणक परिचालक कार्यरत होते. आता संग्राम बंद होऊन राज्य शासनाने ‘आपले सरकार’ सेवा केंद्र हा नवीन प्रकल्प आणला असून, त्यासाठी संग्राममधील सुमारे ५०० संगणक परिचालक परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना नवीन प्रकल्पात समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाने वेळोवेळी आम्हाला दिले आहे; परंतु शासन निर्णयातील जाचक अटी, तसेच पंचायत समिती स्तरावर पाडलेल्या चुकीच्या क्लस्टरमुळे रायगड जिल्ह्यात फक्त२७६ संगणक परिचालकांची नियुक्ती के ली असून,सुमारे २२५ संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आली आहे. त्यामुळे १ मार्चपासून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनाला रायगड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देत आम्ही संगणक परिचालक या कामबंदमध्ये सहभागी होत आहोत, असे कांबळे यांनी सांगितले.
संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन
By admin | Published: March 07, 2017 2:45 AM