नेरळ खांडा रस्त्याचे काँक्रीटीकरण अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:19 PM2019-03-11T23:19:12+5:302019-03-11T23:19:25+5:30

रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ठेकेदाराकडून दिशाभूल करण्यात येत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Concreteization of the Neel Khanda road is incomplete | नेरळ खांडा रस्त्याचे काँक्रीटीकरण अपूर्ण

नेरळ खांडा रस्त्याचे काँक्रीटीकरण अपूर्ण

Next

नेरळ : नेरळ शहरात एमएमआरडीएच्या निधीमधून अंतर्गत रस्त्यांची सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. ही कामे निकृष्ट असल्याचे अनेकदा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने स्पष्ट केल्याने आता खांडा येथील रस्ता अपूर्णच राहणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने आमसभेत दिल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ठेकेदाराकडून दिशाभूल करण्यात येत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

नेरळ शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण पाहता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुमारे २३ कोटींचा निधी नेरळ शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेकडे हा निधी वर्ग करून डिसेंबर २०१६ मध्ये नेरळमधील रस्त्यांचे काम सुरू करण्याचे आदेश निघाले. मात्र दोन वर्ष उलटून गेले तरी अद्याप ही कामे सुरूच आहे.

ठेकेदाराकडून नेरळ स्टेशन ते खांडा रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते. या कामासाठी २ कोटी ७७ लाख एवढी रक्कम खर्च करून खांडा येथील सिमेंट काँक्र ीट रस्ता करण्यात येत होता. हे काम करताना रस्ता अपूर्णच करण्यात आला आहे. त्यापुढील रस्ता कधी होईल या प्रतीक्षेत ग्रामस्थ होते. मात्र नुकत्याच झालेल्या आमसभेत रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्ता अपूर्णच असल्याचे स्पष्ट केल्याने खळबळ उडाली आहे.

रस्त्याच्या कामाला सुरवात करताना ठेकेदाराचे मनमानी काम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे अनेकदा कामांबाबतीत नेरळकरांनी आंदोलन उपोषण केले. खांडा येथील काम करताना रस्ता कुठून कुठपर्यंत करण्यात येणार, असा साधा फलकही बांधकाम विभागाने लावण्याची तसदी न घेतल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. खांडा परिसरात नव्याने केलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेल्याने कामांबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. एकूणच रस्त्याच्या कामामुळे दुर्दशा झालेला खांडा येथील उर्वरित रस्ता पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

नेरळ रेल्वे स्टेशन ते खांडा हा सिमेंट काँक्र ीट रस्ता झाला आहे तेवढाच मंजूर होता या पुढे तो होणार नाही.
- ए. ए. केदार, उपअभियंता,
जिल्हा परिषद बांधकाम विभाग
रस्ता जात पुढे होणार नव्हता तर दिव्या दीप हॉटेल ते खालील रस्त्यालगतच्या नागरिकांना नोटिसा का दिल्या गेल्या? तेथील मोजमापे का घेतली गेली ? या रस्त्यासाठी सुमारे पाऊणे तीन कोटीची तरतूद कशासाठी होती? जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांची दिशाभूल करण्यात येत आहे.
- अंकुश शेळके, तालुका अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Web Title: Concreteization of the Neel Khanda road is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.