रायगडमधील कुलाबा किल्ल्याची दुरवस्था होणार दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 01:14 AM2020-10-01T01:14:53+5:302020-10-01T01:15:18+5:30
आॅनलाइन बैठकीत झाला निर्णय : भारतीय पुरातत्त्व विभाग उद्या करणार पाहणी
आविष्कार देसाई।
रायगड : ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याची दुरवस्था दूर करण्याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. २ आॅक्टोबर - महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी किल्ल्याची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कामासंबंधीच्या निविदा काढून कामाला सुरुवात होणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे इतिहासप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
याबाबतची आॅनलाइन बैठक रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने पार पडली. बैठकीला पालकमंत्री अदिती तटकरे, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक (प्रभारी) राजेंद्र यादव, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि किल्ल्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणारे अलिबागमधील तरुण किशोर अनुभवने, यतिराज पाटील, आकाश राणे, वैभव भालकर, हृषीकेश चिंदरकर हेदेखील उपस्थित होते.
‘कुलाबा किल्ल्यासाठी तरुण मावळे सरसावले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेत तातडीची बैठक बोलावली होती. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आॅनलाइन बैठक सुरू झाली. त्या वेळी तक्रारदार तरुण मावळ्यांनी किल्ल्याच्या दुरवस्थेचा मुद्दा स्पष्ट केला. खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत पाहणी गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे राजेंद्र यादव यांना किल्ल्याच्या दुरवस्थेचा पाहणी दौरा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार २ आॅक्टोबर - महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी ४ वाजता किल्ल्याची तुटलेली तटबंदी आणि ढासळलेल्या बुरुजांची पाहणी करण्याचे यादव यांनी मान्य केले. पाहणी झाल्यावर लवकरच प्रशासकीय पूर्तता करण्यात येईल असे बैठकीत ठरल्याचे तक्रारदार किशोर अनुभवने यांनी सांगितले.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची घेतली दखल
इतिहासातील शौर्याची साक्ष देणाऱ्या अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याचे बुरूज आणि तटबंदी ढासळत आहे. तातडीने याची दुरुस्ती केली नाही, तर तटबंदी आणि बुरूज पूर्णत: नष्ट होणार आहेत. याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी अलिबाग येथील तरुणांनी केंद्र सरकारकडे १९ सप्टेंबर रोजी केली होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
कुलाबा किल्ला हा महाराष्ट्राची शान आहे. पुरातत्त्व वास्तू, गड-किल्ले यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. कुलाबा किल्ला भावी पिढीसाठी प्रेरणादायी राहावा. यासाठी त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. २ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता किल्ल्याची पाहणी करण्यात येणार आहे. - खासदार सुनील तटकरे