खालापूर : खोपोली पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रु ग्णालयात स्थिती गंभीर बनली आहे. खाटांची संख्या कमी असल्याने उपचारासाठी दाखल होत असलेल्या रु ग्णांना वार्ड बाहेर मिळेल त्या जागेत उपचार करण्याची वेळ येत आहे.जवळपास दीड लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरासाठी खोपोली पालिकेच्या २२ खाटांचे रुग्णालय आहे. सध्या हे रूग्णालाय सलाईनवर असल्याची स्थिती आहे. अपूर्ण खाटा, मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेले एक्सरे मशिन, आपत्कालीन स्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठीचे जनरेटर बंद, डॉक्टरांची कमतरता, अपूर्ण मनुष्यबळ, महत्त्वाच्या साधन सामग्रीची कमतरता यामुळे येथे दाखल होत असलेल्या रुग्णांना उपचारादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा असल्याने जुलाब, उलट्या, थंडी ताप, टायफॉईड, कावीळ अशा आजारांची लागण झालेल्या रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातही आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या रु ग्णांची संख्या मोठी आहे. याबाबत मुख्य आरोग्य अधिकारी दीपक सावंत म्हणाले की, पालिका या रु ग्णालयासाठी दरवर्षी आर्थिक निधी खर्च करते, परंतु काही अडचणी येत असल्याने या समस्या निर्माण होत आहेत. तर हे रु ग्णालय चालविताना पालिकेला अडचणी येत असल्याने व वाढत्या लोकसंख्येसाठी आधुनिक सोयी-सुविधायुक्त सरकारी रु ग्णालय खोपोलीत असावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे नगराध्यक्ष दत्ता मसुरकर म्हणाले. (वार्ताहर)
सुविधांअभावी रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2015 12:28 AM