पोलादपूर : तालुक्यातील पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या दोन महिला डॉक्टर वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. मात्र १ रजेवर तर १ प्रशिक्षणासाठी गेल्याने गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास धडक देत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. पळचिल आरोग्य केंद्रात बोराडे व सकपाळ या दोन महिला डॉक्टरांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र बोराडे या प्रशिक्षणासाठी तर सकपाळ या रजेवर असल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून बाह्य रुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांना उपचाराअभावी परतावे लागत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी सरपंच व पोलीस पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सरपंच वैशाली जाधव, उपसरपंच उमेश मोरे, पोलीस पाटील आनंद निविलकर, माजी सभापती महादेव निविलकर, माजी उपसभापती सहदेव जाधव, रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य सविता जाधव, निवृत्ती जाधव, रवींद्र जाधव, विलास उतेकर, सखाराम जाधव, विष्णू जाधव आदी २५ ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता सोनवणे हे पंचायत समिती येथील बैठक आटोपून पळचिल येथे दाखल झाले. या वेळी ग्रामस्थांसह सरपंचांनी त्यांना धारेवर धरले.रुग्णांची गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित डॉक्टरांना सूचना देऊन कामकाज योग्य प्रकारे केले जाईल, यापुढे रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे आश्वासन सोनवणे यांनी ग्रामस्थांना दिले.च्पळचिलमधील आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे डॉक्टरांच्या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या होत आहेत. या ठिकणी कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना तातडीने कळविण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी डॉ. सोनवणे यांना केल्या.